आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना म्हणाले, हिंमत हारू नका, आयुष्याची नवी सुरुवात करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरगाबाद - दुष्काळाच्या भयंकर संकटापुढे शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा पर्याय निवडला; पण मागे राहिलेल्या कुटुंबाकडे कुणी बघायचं? तुम्हा महिलांना शिवणयंत्र देऊन आयुष्याची विस्कटलेली घडी बसवणं शक्य नाही; पण ती बसवण्याच्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न नक्कीच आहे. स्वत:च्या पायावर उभ्या राहा. संकटावर जिद्दीने मात करा. हिंमत हारू नका, आयुष्याची नवी सुरुवात करा, मी कायम पहाडासारख्या बापाच्या रूपात तुमच्यापाठी आहे, असा दिलासा प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी दिला.
नाम फाउंडेशनच्या वतीने पळशी येथील विधवा महिलांना शिवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी एमजीएमच्या खादी केंद्रात झाला. प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना वाटप करण्यात आले. या वेळी अभिनेते मकरंद अनासपुरे, खादीच्या संचालिका शुभा महाजन, एमजीएम वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, डॉ. आशा माने-देशपांडे तसेच फॅशन डिझायनिंगच्या प्राचार्य पातुरकर यांची उपस्थिती होती.

या वेळी नानांनी खादी केंद्रातील विविध विभागांना भेटी दिल्या. कामाची पद्धत समजावून घेत आपल्या मिश्कील अन् खट्याळ शैलीत सर्वांशी संवाद साधला. हिंदी- मराठी चित्रपटसृष्टीत ज्याच्या नावाचा दबदबा आहे अशा नानाला अतिशय साध्या झब्बा- कुर्त्यामध्ये समोर उभा पाहून अनेकांना विश्वास बसत नव्हता. तरुणांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. नानासोबत फोटोसाठी सर्वांची चुरस सुरू होती. पण, आपण समाजसेवेचे व्रत घेऊन येथे आलो आहोत, कुठल्याही ग्लॅमरस कार्यक्रमासाठी नाही, असे म्हणत नानांनी सर्वांना दूर सारले अन् गर्दीत असलेल्या पळशीच्या महिलांना पुढे बोलावले.

साहिलला हातात घेऊन नानांनी त्याला खळखळून हसवले. समोरच उभा असलेल्या मकरंद अनासपुरेंकडे साहिल टक लावून पाहत होता म्हणून लगेचच ‘अरे, हा तुझा चाहता दिसतो’, असे ते मिश्कीलपणे म्हणाले.
जोवर जिवंत आहे, तोवर तुमच्या पाठीशी सदैव पहाडासारखा उभा राहील
ज्योतीकरमसिंग जोनवाल, ही २१ वर्षांची विधवा हातात दीड वर्षाच्या लहानग्या साहिलला घेऊन पुढे आली. नानांनी विचारले, का गं पोरी तुझं वय काय? ज्योती म्हणाली, २१ वर्षांची आहे मी. नानांनी लगेच तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. हिंमत हारू नकोस, परिस्थितीपुढे झुकू नकोस. शिवणयंत्राचा वापर करून स्वत:च्या पायावर उभी राहा. शिवणयंत्राने तुझ्या आयुष्याची पोकळी भरून येणार नाही. म्हणून जेव्हा आयुष्यात एखादा योग्य व्यक्ती जोडीदार म्हणून पुढे येईल तेव्हा समाजाच्या बेडग्या विचारांत अडकू नको. कुठल्याही वेळी मी तुझ्या पाठीशी बाप म्हणून एका पहाडासारखा उभा आहे, हे लक्षात ठेव. तुम्ही सगळ्या माझ्या माता-भगिनी-मुली आहात. मी यापुढे जोवर जिवंत आहे, तोवर तुमच्या पाठीशी आहे, हे माझे वचन आहे, अशा शब्दांत नानांनी सगळ्यांशी संवाद साधला. त्यांच्या आवाजातील आपुलकी पाहून विधवांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.