आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीपीएल योजनेत घर मागणाऱ्या वयोवृद्धांना ‘नाम’ने दिला आसरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवे घर - Divya Marathi
नवे घर
औरंगाबाद- ‘कुणी घर देता का घर’ म्हणत शासनाकडे आर्जव करणाऱ्या वयोवृद्ध जोडप्याची हाक ऐकून अभिनेता नाना पाटेकरने नाम फाउंडेशनच्या माध्यमातून या जोडप्याला आसरा दिला. या जोडप्याला छोटेसे पण टुमदार घर बांधून दिले.

पाच वर्षांपासून मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. नापिकीने कर्जबाजारी झालेले अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासनस्तरावर एकीकडे प्रयत्न सुरू असताना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दिग्गज अिभनेत्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मराठवाड्यातील अशा गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. या माध्यमातून नाम फाउंडेशनने शेकडो कुटुंबांना भावनिक व आर्थिक आधार दिला आहे.

नाना रमले खेड्यात..
औरंगाबादजवळ लासूर स्टेशनलगतचे धोंदलगाव नाम फाउंडेशनने दत्तक घेतले आहे. नाना व मकरंद यांनी २ ऑक्टोबर २०१५ रोजी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भेट दिली होती. त्या वेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या काही कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. या कार्यक्रमानंतर नानाने आस्थेने गावातील वयोवृद्ध शेतकऱ्यांची चौकशी केली. ‘तुमच्यासाठी मी काय करू शकतो’, असा प्रश्न नानाने विचारला तेव्हा शेतकरी म्हणाले, ‘आम्हाला काही नको. परंतु, गावात काही निराधार वृद्धांचा आम्ही आमच्या परीने सांभाळ करतो आहोत. त्यांना घर नाही, दार नाही, कुटुंब नाही अन् नातेवाईकही नाहीत. त्यांना मदत करावी.’

कापडी झोपडी पाहून नानांचे डोळे पाणावले
गाव धोंदलगाव. नेहाबाई शिरसाठ (६०) व गंगाधर जाधव (८०) या दोन निराधार वयोवृद्धांची कर्मकहाणीच गावकऱ्यांनी नानास सांगितली. आजारात पती, मुले गेली. आता कुणीच राहिलेले नाही. एक भाऊ होता. तोही गेला आणि नेहाबाई निराधार झाल्या. गावात मोलमजुरी करून कापडी झोपडीत राहू लागल्या.

गंगाधर जाधव यांचीही तीच अवस्था. पत्नी शांताबाईसोबत मिळून कपडे इस्त्री करून या वयात ते पोटाची खळगी भरतात. आता शरीर थकले, दृष्टी अंधुक झाली. त्यामुळे आता कामही करता येत नाही. गावकरीच या दोघांना दोन वेळचे जेवण देतात. कापडी झोपडीत ते कसेबसे दिवस काढत होते. या वयोवृद्धांची अवस्था पाहून नानाचे मन हेलावले. त्याने त्या दोन्ही वृद्धांना हक्काच्या घरात पाठवण्याचा संकल्प केला.

बीपीएल असून लाभ नाही : शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील कुटंुब म्हणून घर मिळावे यासाठी हे दोन्ही वयोवृद्ध शासनदरबारी तीस वर्षांपासून चकरा मारत होते, परंतु शासनाच्या सर्वेक्षणातील गोंधळ आडवा आला. या दोन्ही वृद्धांचे नाव बीपीएल योजनेत शेवटपर्यंत समाविष्ट झालेच नाही. त्यामुळे हक्काचे घरही मिळाले नाही.

ही बाब लोकांनी नानास सांगितली तेव्हा नानाने या दोघांसाठी तत्काळ पक्के व हक्काचे घर बांधून देण्याचा संकल्प केला होता.

दिवाळी साजरी झाली नव्या घरात
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नानाने या वृद्धांना पक्के घर बांधून दिले. शिवाय गावाला स्वच्छ पाणी पिता यावे यासाठी वॉटर फिल्टरही दान दिले. यंदाच्या दिवाळीतच नेहाबाई, गंगाधर जाधव व शांताबाई यांनी आपल्या नव्या घरात दिवाळी साजरी केली.
बातम्या आणखी आहेत...