आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागापूर शिवारात गोळीबारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागापूर शिवारात शेतातील उभ्या पिकात बकऱ्या गेल्याच्या वादावरून झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला होता. तर संतप्त लोकांच्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले होते. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी रऊफ पटेल (४५ रा. खंडोबाचे सातारा) व त्यांचा वाहनचालक शेख अब्दुल शेख अब्बास (५०) या दोघांविरुद्ध पोलिसांनी ठार मारण्याच्या प्रयत्नासह भारतीय हत्यार कायदा परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

वाळूजजवळील नागापूर शिवारात (गट क्र.२०)शेती आहे. या शेतातील बांधावर बकऱ्या गेल्याच्या कारणावरून शेतमालक रऊफ पटेल यांचा जावेद कुरेशीसोबत वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी केलेल्या गोळीबारात रस्त्याने जात असलेला साजेद ऊर्फ सज्जू कुरेशी (२५) हा जखमी झाला होता. त्याच्या दिशेने दोनवेळा गोळीबार करण्यात आला. त्यातील एक गोळी त्याच्या मांडीला, तर दुसरी हाताला लागल्याने साजेद जखमी होऊन जागेवर कोसळला होता. त्यानंतर आलेल्या शेंदुरवादा येथील संतप्त लोकांनी रऊफ पटेल व शेख अब्दुल शेख अब्बास या दोघांना बेदम चोप दिला होता. त्यानंतर या तिघांनाही उपचारांसाठी घाटी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी जावेद मज्जीद कुरेशी यांनी वाळूज पोलिसात रात्री उशिरा तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी रऊफ पटेल व शेख अब्दुल शेख अब्बास या दोघांविरुद्ध संगनमत करून ठार मारण्याच्या प्रयत्नासह भारतीय हत्यार कायदा परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोेंदवला आहे. पोलिसांनी रऊफ पटेल यांच्याकडून परवाना असलेले पिस्तूल व सफारी कार ताब्यात घेतली आहे. वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम याप्रकरणाची चौकशी करीत आहेत. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचेही समोर आले होते. मात्र, फिर्यादीच्या तक्रारीवरून असा गुन्हा नोंद झाल्याचे या वेळी पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जखमी तिघांचीही प्रकृती सुधारत असून त्याच्यावर घाटी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पथकाकडून पाहणी
नागापूर शिवारात झालेल्या या गोळीबारप्रकरणी पोलिस पुरावे गोळ करत आहेत. या दरम्यान उडविलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या तसेच या परिसरात काही स्पोटके पुरलेली आहेत का, याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाची बॉम्बशोधक पथकाने पाहणी केली. मात्र, तसे काही पुरावे मिळाले नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली. या पथकात सहायक पोलिस उपनिरिक्षक प्रकाश दायमा, जमादार राजेंद्र चव्हाण, पोलिस नाईक काशीनाथ सोमासे, सुरेश तारो, सुनील गायकवाड, विश्वास शिंदे यांचा समावेश होता.

फोटो - नागापूर शिवारात झालेल्या या गोळीबार प्रकरणी घटनास्थळाची बॉम्बशोधक पथकाने पाहणी केली.