आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार खैरे-दानवेंच्या वादात नागरेंचा पत्ता कटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेच्या तिकीटवाटपात खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यातील शीतयुद्धाचा फटका सभागृह नेते किशोर नागरे यांना बसला. खैरे नागरे यांच्या पत्नीसाठी, तर दानवे रमेश इधाटे यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी जोर लावत होते. या शक्तिप्रदर्शनात दोन्ही उमेदवारांना बी फाॅर्म देण्यात आला व आज छाननीच्या वेळी बी फाॅर्म सादर करण्याच्या वेळेवर फैसला करत इधाटे यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला. यामुळे संतापलेल्या नागरे यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे.

मुलगा ऋषिकेश खैरे, पुतण्या सचिन खैरे, महापौर कला ओझा, गिरजाराम हाळनोर यांच्या पत्नी, घोडेले दांपत्य या आपल्या समर्थकांना तिकिटे मिळवून देण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रयत्न केले, पण सभागृह नेते किशोर नागरे यांच्यासाठी अशी मदत करण्यात मात्र त्यांना अपयश आले. मयूरनगर वाॅर्डात किशोर नागरे यांनी पत्नी स्वाती नागरे यांच्यासाठी तिकीट मागितले होते.

खासदार खैरे नागरे यांच्यासाठी प्रयत्न करीत होते, तर तिकडे अंबादास दानवे यांनी रमेश इधाटे यांच्या पत्नी वंदना इधाटे यांच्यासाठी ताकद पणाला लावली. दोन्ही उमेदवारांनी वाॅर्डातील सर्वेक्षणात आपलेच नाव अग्रस्थानी असल्याचा दावा केला होता. तिकिटाच्या साठमारीत दानवे यांनी इधाटे यांच्यासाठी तिकीट निश्चित केले व त्यांना बी फाॅर्मही देऊन टाकला. तिकडे खैरे यांना नागरे यांचा पत्ता दानवे यांनी कापल्याचे समजताच त्यांनी दानवे यांना जाब विचारला. या विषयावरून त्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे समजते. त्यामुळे खैरे यांनी तो अस्मितेचा प्रश्न करीत मुंबईत बोलून नागरे यांच्या नावाला हिरवा कंदील मिळवला. त्यानंतर दानवे यांनीच नागरे यांनाही बी फाॅर्म देऊन टाकला.

सी फाॅर्मचा घोळ
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मयूरनगरातून शिवसेनेच्या वतीने इधाटे व नागरे या दोघांनीही पक्षाचे अधिकृत बी फाॅर्म जोडत अर्ज भरला. हा घोळ निस्तरण्यासाठी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी काल सायंकाळी एक पत्र काढत इधाटे यांच्या नावाची घोषणा स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले.

फाॅर्म स्वीकारला नाही
खैरे यांनी प्रयत्न करून अनिल देसाई यांच्या सहीने सी फाॅर्म आणलाही होता; पण आज छाननीच्या वेळी तो निवडणूक अधिका-यांनी स्वीकारला नाही. नसता या वाॅर्डात नागरे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली असती. इधाटे यांनी नागरे यांच्या दोन तास आधी बी फाॅर्म सादर केल्याने निवडणूक अधिका-यांनी इधाटे यांचा अर्ज ग्राह्य धरला.

आता नागरे बंडखोर
मयूरनगरचे तिकीट देणे हा चाॅकलेट दाखवून न देण्यासारखा प्रकार झाल्याने नागरे संतापले आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खैरे व दानवे यांच्या भांडणात नागरे यांचा पत्ता कापला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.