आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील निकालाचा युतीवर परिणाम नाही, 5 पैकी 3 नगराध्यक्षपदे सेनेकडे तर 2 भाजपकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील नगर परिषदांचे पहिल्या टप्प्यातील निकाल समोर आले अन् भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. याचा कोणताही परिणाम औरंगाबाद जिल्ह्यातील नगर परिषदांच्या युतीच्या जागावाटपावर होणार नसल्याचे दोन्हीही पक्षांच्या स्थानिक सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ठरल्याप्रमाणे तीन ठिकाणी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला जाईल, तर खुलताबाद गंगापूर येथील नगराध्यक्षपद भाजपला सोडले जाणार आहे.

पैठण, कन्नड, खुलताबाद, गंगापूर आणि वैजापूर या पाच नगर परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १८ डिसेंबरला होत आहेत. त्यातील वैजापूरचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने तेथील निवडणूक जानेवारी महिन्यात होईल. या पाच ठिकाणच्या निवडणुकांसाठी युतीची बोलणी सुरू होती. प्रारंभी शिवसेनेच्या वतीने भाजपला फक्त खुलताबादचे नगराध्यक्षपद देऊ केले होते, परंतु भाजपने दोन जागांची मागणी केली होती. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे तेथील नगराध्यक्षपदासाठी आडून बसले होते. नंतरच्या बोलणीत शिवसेनेने भाजपला खुलताबादबरोबरच गंगापूरचे नगराध्यक्षपद दिले, परंतु उमेदवारी अर्ज भरताना भाजपकडून पैठणच्या नगराध्यक्षपदासाठीही अर्ज दाखल केला गेला. त्यामुळे काहीसे वादाचे वातावरण होते. त्यातच सोमवारी पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल समोर आले. अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षाने पहिल्या क्रमांकावर मुसंडी मारली. असे असले तरी मराठवाड्यातील नगर परिषदांमध्ये भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहील, असे पोलिसांच्या गुप्तचर विभागाने पूर्वीच क‌ळवले आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते लगेच हुरळून गेलेले नाहीत. स्थानिक नेत्यांशी चर्चा केली असता राज्यातील निकालांचा मराठवाडा तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील युतीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.

आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता जेथे निवडणुका होत आहेत त्या पाचही नगर परिषदांच्या शहरांमध्ये भाजपची फारशी ताकद नाही. भाजपही स्वत:ची ताकद ओळखून होता. त्यामुळेच फक्त खुलताबादचे नगराध्यक्षपद सेनेने भाजपला देऊ केले होते.

युतीसाठी प्रयत्न सुरू
या निकालांचा मराठवाडा किंवा औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना भाजपच्या युतीवर काहीही परिणाम होणार नाही. स्थानिक पातळीवर युती व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि तशा सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. युती झाली तर जास्तीच्या जागा येतील. काँग्रेस राष्ट्रवादीला रोखणे हेच आमचे ध्येय आहे. - शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप.

स्थानिक स्तरावर निर्णय
राज्यातीलअन्यठिकाणच्या निकालाचा येथे परिणाम होणार नाही. आमची बोलणी पूर्वीच सुरू होती. पैठण येथे भाजपने उमेदवार दिला. त्यांनी तेथून माघार घ्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पाचपैकी दोन नगराध्यक्षपदे भाजपला तीन सेनेला असे समीकरण ठरले आहे. नगरसेवकाच्या जागावाटपाचे निर्णय स्थानिक पातळीवर होतील. काहीही बदल होणार नाही. - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

बातम्या आणखी आहेत...