आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nageshwar Shrigangar Worshipping 500 Years Tradition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावण विशेष: नागेश्वरवाडीतील नागेश्वराच्या शृंगारपूजेची 500 वर्षांची असलेली परंपरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गजबजलेल्या नागेश्वरवाडी भागात 500 वर्षे जुने नागेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 250 वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार बडोदा संस्थानच्या राजाने केला होता. आजूबाजूला मोठय़ा इमारती व सिमेंटचे जंगल असून त्यात हे जुन्या धाटणीच्या बांधकामाचे मंदिर खूप उठून दिसते. दर श्रावणी सोमवारी मंदिरात शृंगारपूजा केली जाते. या पूजेला तब्बल 500 वर्षांची परंपरा असल्याचे येथील पुजारी सांगतात.

शहराच्या मध्यवर्ती भागात हा नागेश्वरवाडी भाग येतो. मंदिराचे बांधकाम विटा व चुन्यात आहे. सध्या या मंदिराची मुख्य इमारत बर्‍यापैकी असली तरी तिची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मंदिराचा परिसर भव्य असून कळस अतिशय सुंदर आहे. भोवताली सेवेकर्‍यांना राहण्यासाठीची घरे आहेत.

नंदीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य
मंदिराची दोन मजली इमारत चौकोनी आकाराची आहे. भव्य प्रवेशद्वारातून आता गेल्यावर खोलात पायर्‍या उतरून जावे लागते. खाली छोटेसे प्रसन्न गर्भगृह आहे. त्यात नागेश्वराचे विलोभनीय शिवलिंग दिसते. त्याच्या बाजूलाच पुरातन नंदीची मूर्ती आहे. महादेवाच्या कुठल्याही मंदिरात नंदीची मूर्ती सहसा बाहेर दिसते. पण येथे मात्र नंदी महादेवाच्या पिंडीच्या बाजूलाच आहे. शिवलिंगाच्या मागे संगमरवराची पार्वतीची छोटी मूर्तीही पाहायला मिळते.

नागेश्वर या नावामागील कथा
शहराच्या मध्यवस्तीत असूनही हे मंदिर विशेष प्रसिद्ध नाही. शहरातील अनेकांना नागेश्वराचा परिचय नाही. कारण हे मंदिर कालौघात एका कोपर्‍यात गेले आहे. त्यामुळे आता रस्त्यावरून फक्त कळस दिसतो. प्रवेशद्वार दिसत नाही. मंदिराचे पुजारी शंकर मुंगीकर यांनी सांगितले की, या मंदिराला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. त्या वेळी हे मंदिर शेतातच होते. या भागात रात्री नागांचा वावर असायचा. त्यावरूनच या मंदिराला नागेश्वर व पुढे कॉलनीलाही तेच नाव पडले. 250 वर्षांपूर्वी बडोदा संस्थानच्या राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून मुंगीकर कुटुंब या मंदिराची देखभाल करत आहे.