आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत पूर्ण होणार समृद्धी महामार्ग;जागतिक पातळीवर मागवल्या निविदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या समृद्धी सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस हायवेचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. सध्या भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी केली जात आहे. त्यापैकी २५० किलोमीटरची मोजणी पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. 

नागपूरहून मुंबई हे अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नागपूर-मुंबई हा सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस हायवे प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जात असलेल्या या मार्गाची लांबी ७१० किमी आहे. मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातून हा मार्ग जातो आहे. हा मार्ग १२० मीटर रुंदीचा असून त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठीची मोजणी पूर्ण करण्यात आली असून आता संयुक्त मोजणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेसंदर्भात रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी शुक्रवारी माहिती दिली.

संयुक्त मोजणीमध्ये जमीनमालक, जिल्हा प्रशासन आणि एमएसआरडीसी अशी तिघांची उपस्थिती असणार आहे. शेतकऱ्याने त्याची जमीन दाखवल्यानंतर प्रशासनाच्या मदतीने त्याचे स्थान निश्चित करून त्या जमिनीची जागेवरच वर्गवारी केली जाणार आहे. त्यानुसार ती जमीन जिरायती, हंगामी बागायती किंवा बागायती याचे स्वरूप ठरवले जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्याच्या दृष्टीने ही मोजणी उपयुक्त ठरणार आहे. २५० किलोमीटरची संयुक्त मोजणी पूर्ण केली असल्याचे मोपलवार यांनी सांगितले. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे हा मार्ग राज्याच्या विकासाला चालना देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना भूसंपादनानंतर मिळणाऱ्या लाभाची माहिती देऊनच त्यांच्या जमिनीचे संपादन केले जात असल्याचे मोपलवार यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यात संयुक्त मोजणीची गती कमी आहे तेथे जाऊन आपण या कामाचा सध्या आढावा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचीही उपस्थिती होती. 

या माध्यमातून २४ जिल्हे जोडणार 
हामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जातो आहे. या दहा जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर १४ जिल्हे या महामार्गापासून ३० मिनिटे ते दीड तासाच्या अंतरावर असणार आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने मार्ग उपयुक्त ठरणार असल्याच मोपलवार यांनी सांगितले. 

ताबा घेताच मोबदला 
जमिनीची मोजणी होऊन ताबा घेतल्यानंतर त्या तारखेला अॅडव्हान्स मोबदला दिला जाईल. त्यानंतर दरवर्षी हा मोबदला शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. जिरायती २०, हंगामी बागायती २५, बागायतीसाठी एकरी ६० हजार रुपये वर्षाला मोबदला दिला जाणार आहे. त्यात दरवर्षी १० टक्के वाढ होणार आहे. 

निधीचा प्रश्नच येत नाही 
राज्यसरकारचे केवळ कोटी रुपये खर्च होत आहेत, आवश्यक असणारा सर्व निधी हा बँकांकडून कर्ज स्वरूपात येणार आहे. काम सुरू करण्यासाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही. या कामासाठी घेतलेल्या सर्व कर्जाची जबाबदारी ही रस्ते विकास महामंडळाचीच असणार आहे, अशी माहिती राधेश्याम मोपलवार यांनी या वेळी दिली. 

कामाचे भाग केले जाणार 
हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी ७१० किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम पूर्ण करताना ठरावीक अंतराचे भाग करण्यात येतील. हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल या मार्गावर २०२० मध्ये प्रत्यक्ष वाहतूक सुरू झालेली असेल, असे राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले. रस्ते विकास महामंडळाने आवश्यक तयारी सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली. 

जागतिक पातळीवर निविदा 
३० हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. सध्या जागतिक पातळीवर प्री बीड निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढील कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर साधारणत: जूनमध्ये यासाठी कार्यारंभ आदेश दिले जातील. त्यानंतर पुढील काही दिवस तांत्रिक बाबींची पूर्तता करून पावसाळा संपल्यानंतर लगेचच ऑक्टोबरच्या सुमारास प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. 
 
 
बातम्या आणखी आहेत...