आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या निधीत वाटेकरी; नागपूरही आता पर्यटन जिल्हा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोणतीही मागणी नाही. कधी आश्वासनही दिले नाही. तरीही राज्य सरकारने २०१६ च्या पर्यटनात नागपूरला विशेष पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देऊन टाकला आहे. यामुळे पर्यटनाची राजधानी म्हणून घोषित झालेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या निधीत विदर्भातून एक वाटेकरी निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाचा कार्यभार अाहे. त्यांनी विशेषाधिकार वापरून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादेत सुरू होणारे नॅशनल स्कूल आॅफ लॉ, आयआयएम व स्पोर्ट‌्स अॅथाॅरिटी ऑफ इंडियाचे विभागीय केंद्र असे विविध प्रकल्प नागपुरात हलवल्यानंतर आता राज्य शासनाचे लक्ष पर्यटन व्यवसायाकडे गेले आहे. राज्याने नुकत्याच जाहीर केलेल्या पर्यटन धोरणाच्या पान क्रमांक ७ आणि ३९ वर नागपूरचा उल्लेख विशेष पर्यटन जिल्हा असा केला आहे. औरंगाबाद व सिंधुदुर्गचीही नावे आहेत. यामुळे आतापर्यंत विशेष पर्यटन जिल्हा म्हणून औरंगाबाद आणि सिंधुदुर्गला मिळणारे लाभ नागपूरलाही मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे नागपूरला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी मागणी कधीच झाली नव्हती. सिंधुदुर्गला १९९९ मध्ये पर्यटन जिल्हा होण्याचा मान मिळाला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ती घोषणा केली होती. आघाडी सरकारचे पर्यटनमंत्री विजयकुमार गावीत यांनी औरंगाबादला पर्यटन राजधानी घोषित केले होते. १७ एप्रिल २०१५ रोजीच्या शासन आदेशानुसाार औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. सिंधुदुर्गनंतर औरंगाबाद हा दुसरा पर्यटन जिल्हा ठरला. मात्र, नागपूरच्या बाबतीत असा कोणताच अध्यादेश काढण्यात आला नाही. थेट पर्यटन धोरणातच ते नमूद केले गेले आहे. आधीच पर्यटन िवकासासाठी राज्य सरकार फारसा निधी देत नाही. त्यात आता नागपूरची भर पडली आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि निधी विदर्भाकडेच खेचून नेण्याचे त्यांचे धोरण असल्याने औरंगाबादच्या वाट्याचा निधी नागपूरला जाण्याची शक्यता पर्यटनप्रेमी व्यक्त करत आहेत.

दीक्षाभूमी, कान्हा केसाळी, बांधवगड, पेंच राष्ट्रीय उद्यान, ताडोबा-अंधारी अभयारण्य, मेळघाट, स्वामीनारायण मंदिर, झीरो माइल, मध्यवर्ती संग्रहालय, नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, कामठी, मनसार, रामटेक, खिंडसी धरण, नगरधन, तोतलडोह धरण आदी नागपूर आिण विदर्भातील पर्यटन स्थळे आहेत, असा उल्लेख पर्यटन धोरणात आहे. नागपूर जिल्ह्यात नसलेल्या पर्यटनस्थळांचाही त्यात कौशल्याने समावेश केला आहे.

थेट समावेश
२०१६ च्या पर्यटन धोरणात थेट नागपूरचा समावेश पर्यटन जिल्हा म्हणून करण्यात आला आहे. याचा वेगळा जीआर काढण्यात आलेला नाही. नागपूरमधील पर्यटनाच्या दृष्टीने असणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे हा समावेश करण्यात आला आहे. -सतीश सोनी, एजीएम, एमटीडीसी
बातम्या आणखी आहेत...