आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगणे समृद्ध करणारे चित्रपट बनावेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अभिनेता डान्स करतो आणि त्याच्याभोवती १०० जण असतात अशा अवास्तव चित्रपटांमुळे जगण्यातील विकृती वाढली आहे. प्रत्यक्षात, जीवन समृद्ध करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती व्हायला हवी, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
"दिव्य मराठी'च्या कार्यालयाला त्यांनी शनिवारी भेट दिली. त्या वेळी दिलखुलासपणे संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. "फँड्री' चित्रपटाने प्रकाशझोतात आलेले मंजुळे ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर असल्याची प्रचिती त्यांच्याशी बोलताना आली. कोल्हापुरी भाषेतील बोलणे, वागण्यातील साधेपणा आपले मत ठामपणे मांडण्याची त्यांची शैली भावणारी होती.
मंजुळे म्हणाले, आजवर हिंदी-मराठी आणि भारतातील इतर भाषांत तयार होणारे चित्रपट हे प्रेमाभोवती फिरणारे आहेत. आयुष्यात आपण कधीच प्रेम करत नसतो. करतो तो व्यवहार असतो. लग्न म्हणजे सहजतेने केलेला व्यवहार आहे. धर्म, जात, आर्थिक स्थिती आणि इतर बाबी पाहून आपल्याकडे माणसे प्रेम करायचे की नाही, हे ठरवतात. त्यामुळे प्रेम शोधण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहायला जायची वेळ येते. मी माझ्या चित्रपटातून सरळ, साधी आणि वास्तवाशी निगडित असलेली कथा सादर करण्यावर भर असतो. त्यामुळे कदाचित ते प्रेक्षकांना भावत असावे. आपल्या देशातील मोठा भाग ग्रामीण जीवन जगत आहे. त्यांचे जीवन पडद्यावर आले पाहिजे. मुंबई-पुण्यातील भाषेचे प्रमाण कुणी ठरवले आहे, असा सवाल त्यांनी केला. तिथे ज्यांच्याशी बोलू तो साहित्यिकच असतो. पण खरी भाषा आपल्या भागात जन्मते. खेड्यातील शेतकरी, कष्टकरीच भाषा जन्माला घालतात. त्यासाठी साहित्यिक असण्याची गरज नाही. त्यांची भाषा जगण्यातून जन्माला येते. म्हणूनच आपल्या सगळ्यांना आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

स्त्रियांना कायम दुय्यम दर्जा
आपल्या समाजाची बांधणीच अशी आहे, ज्यामध्ये स्त्रियांना कायम दुय्यम दर्जा आहे. पण प्रत्यक्षात स्त्रियांमध्ये संवेदनशीलता आणि माणूसपण जिवंत आहे. पुरुष फार भित्रे असतात. जगण्यापासून लांब पळतात. फसव्या गोष्टींमध्ये संपूर्ण समाज अडकला आहे म्हणूनच दु:खात आहोत. पुरुषांनी रडू नये हीदेखील अशीच गोष्ट आहे. वास्तविक भावनांना वाट करायची असेल तर रडून मोकळे व्हा, मग तुम्ही पुरुष असा की महिला, काय फरक पडतो? मी स्वत: चित्रपट पाहताना अनेकदा रडतो. वास्तविक जीवनाच्या अनेक गर्भित गोष्टींकडे लक्ष वेधतानाच त्यांनी सर्वांना खळखळून हसवले.