आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagre Training School Student Fighting With President

नागरे प्रशिक्षण केंद्रात हाणामारी; निकृष्ट जेवण मिळत असल्याने संतप्त युवकाची तोडफोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नागरे पोलिस सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात निकृष्ट जेवण मिळत असल्याचा आरोप केल्याने प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि केंद्र संचालक यांच्यात रविवारी (10 फेब्रुवारी) तुंबळ हाणामारी झाली. यात दोन युवक जखमी झाले आहेत. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत सिडकोतील या केंद्रात गोंधळ सुरू होता. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात परस्परांविरोधी दंगलीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

या केंद्रात बहुतांश परगावची मुले प्रशिक्षण घेतात. मागील तीन ते चार दिवसांपासून प्रशिक्षणार्थींना वेळेवर जेवण दिले जात नव्हते. तसेच जे जेवण दिले जायचे ते निकृष्ट दर्जाचे होते. याचा युवकांना राग आल्याने दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्या वेळी केंद्र चालकाने काही मुलींना तेथे पाठवले. त्याच वेळी त्या मुली व युवकांमध्ये वाद झाला. नंतर हे प्रकरण वाढत गेले. संतापलेल्या युवकांनी केंद्रात तोडफोड सुरू केली. त्यानंतर संस्थाचालकही या वादात पडले. दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात प्रशिक्षणार्थींपैकी दोघांचे डोके फुटले. पोलिसांनी दोन्ही गटांच्या लोकांना ताब्यात घेतले. नागरे यांच्या वतीने शेख रहीम तर प्रशिक्षणार्थींच्या वतीने आशिष साळवे यांनी तक्रार दिली. दोन्ही गटांविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदवला असून पोलिस उपनिरीक्षक संगीता राऊत पुढील तपास करीत आहेत.

केंद्रचालकावर आधीच विनयभंगाचा गुन्हा

जालना पोलिसांतून बडतर्फ करण्यात आलेल्या किशन नागरे यांच्या पत्नीच्या नावाने हे प्रशिक्षण केंद्र चालवले जाते, परंतु प्रत्यक्षात किशन नागरे हेच सर्व कारभार पाहतात. नागरे यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी असून दोन तरुणींचा विनयभंग केल्याची तक्रार दोन महिन्यांपूर्वी देण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.