आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारशावर घाला: नहर-ए-अंबरीवर मुजोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादेतील ऐतिहासिक निर्मिती आणि टंचाईच्या काळात निम्म्या शहराला पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेल्या नहर-ए-अंबरीची तोडफोड सुरूच आहे. वारसा संरक्षण समितीने दिलेला स्थगिती आदेश धुडकावून हिमायतबागेतील फळ संशोधन केंद्राने संरक्षक भिंतीचे बांधकाम गेल्या दोन दिवसांपासून सुरू केले आहे. याबद्दल समितीने संताप व्यक्त केला आहे. हे बांधकाम बेकायदा असून ते तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी दै. ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

पुरातत्त्व वास्तू संरक्षण कायद्यानुसार नहरींच्या तोडफोडीस जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, संरक्षक भिंतीचे बांधकाम कायदेशीरच असल्याचा दावा फळ संशोधन केंद्रातर्फे करण्यात आला आहे. दिल्ली गेटकडून मौलाना आझाद महाविद्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर डाव्या बाजूला फळ संशोधन केंद्र आहे. या केंद्राच्या संरक्षक भिंत उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 150 फूट लांब आणि अडीच-तीन फूट रुंदीचे चर खोदण्यात आले आहेत. पाया आणि भिंत मजबूत करण्यासाठी लोखंडी जाळीचा वापर करून खांबही उभे केले जात आहेत. या कामाची दै. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने पाहणी केली असता नहर-ए-अंबरीची मोडतोड झाल्याचे दिसून आले.

हिमायतबागेकडून येत फळ संशोधन केंद्रातून नेहरू उद्यानाकडे जाणारी नहर चार ते पाच ठिकाणी फुटलेली आहे. गेल्या वर्षी वर्षी फळ संशोधन कें द्राच्या वतीने या ऐतिहासिक नहरीवरच संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात आली होती. जून 2012 मध्ये ते काम सुरू झाले होते. जेसीबीने खड्डे केल्यामुळे त्या वेळी नहरीचे पाइप फुटले होते. त्यातून पाण्याचा छोटासा प्रवाहही वाहत असल्याने नहर तुटल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले होते. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने 11 जून 2012 रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत समितीने तोडफोड आणि बांधकामप्रकरणी फळ संशोधन केंद्राला नोटीस बजावली. भिंतीचे बांधकाम पाडण्यात येईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात समितीने फक्त काम थांबवण्याची नोटीस पाठवली. अर्धवट बांधलेली भिंत पाडण्यात आली नाही. त्याचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी सिमेंट भिंतीच्या बांधकामास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.

अत्यंत प्रगत पाणीपुरवठा तंत्र - निझामशाहीचा सरदार आणि औरंगाबादचा शिल्पकार अशी ओळख असलेल्या मलिक अंबरने शहरातील नागरिकांना घरापर्यंत पिण्याचे पाणी मिळवण्याची अत्यंत प्रगत अशी यंत्रणा विकसित केली. त्याने 1618 मध्ये भूमिगत नहर-ए-अंबरीचे जाळे निर्माण केले होते. शहरांभोवतालच्या डोंगरांवरून वाहून येणारे पाणी विशिष्ट तंत्र-यंत्रणेद्वारे शहरात आणले जात होते. त्या काळी या नहरीद्वारे दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना पाणीपुरवठा केला जात होता. माती आणि चुन्याने बनवलेल्या नळांद्वारे नहरीचे पाणी वितरण केले जात होते. या नळांचे जाळे जुन्या शहरात सर्वत्र पसरलेले आहे.