आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारपंपांची जप्ती करून गुन्हे दाखल होणार; नहर, पाणचक्कीचे सर्वेक्षण बुधवारपासून,

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाबरहुकूम महापालिकेचे शहर अभियंता एम.डी. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (15 एप्रिल) झालेल्या पहिल्याच बैठकीत संवर्धन समितीच्या तज्ज्ञ सदस्यांनी कठोर उपाययोजना सुचवल्या. नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीची पाइपलाइन फोडून मोटारपंपाद्वारे पाणी चोरणार्‍यांचे मोटारपंप जप्त केले जाणार आहेत. नहरीची तोडफोड करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जावेत, असे आदेश मनपा कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत.

नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीच्या संवर्धनासाठी समिती पावसाळा सुरू होण्यापूर्वी दीड महिन्याच्या कालावधीत काम करणार आहे. ही समिती बुधवारी (17 एप्रिल) सकाळी आठ वाजता सव्र्हे सुरू करणार असून हे काम चार दिवस चालणार आहे. सव्र्हेनंतर करावयाच्या उपाययोजनांचा अहवाल ही समिती 24 एप्रिलपर्यंत हायकोर्टाला सादर करेल.

नहर आणि पाणचक्कीच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने समितीचे अध्यक्ष तथा मनपाचे शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांच्या दालनात सोमवारी सकाळी 11 ते दुपारी एक वाजता बैठक घेण्यात आली. या वेळी सहायक नगररचना संचालक डी. पी. कुलकर्णी, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक विलास जाधव, एस. ई. अडकुणे, डी. पी. डिझाइन असोसिएटचे प्रदीप देशपांडे, नहरींचे अभ्यासक डॉ. शेख रमझान उपस्थित होते.

बैठकीत डॉ. शेख यांनी चित्रफितीद्वारे नहर-ए- अंबरीची जागोजागी कशी तोडफोड केली जात आहे ते निदर्शनास आणून दिले. नहरीवर जागोजागी अवैध विद्युत पंप टाकून पाण्याचा उपसा केला जात आहे. शिवाय वीटभट्टीचे मालक व शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी नहरीत मोठे दगड टाकून पाणी अडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे या चित्रफितीत दाखवण्यात आले. महिला नहरीवर कपडे धूत असल्याने स्वच्छ पाणी दूषित झाले आहे. या सर्व प्रकारामुळे नहरीला धोका निर्माण झाल्याचे शेख म्हणाले.

सर्वेक्षणात होईल नहरीचे ‘स्कॅनिंग’
17 एप्रिलपासून सर्वेक्षण करून कामास प्रारंभ होईल. तज्ज्ञ नहरीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणी करणार आहेत. दोन्ही नहरीच्या मेनहोलवर 1 ते 100 क्रमांक टाकण्यात येणार आहे. नहरीच्या आत उतरून 100 व्या मेनहोलपासून सर्व्हे सुरू केला जाईल. दोन मेनहोलमधील अंतर मोजणे, तोडफोडीची नोंद, आतील भागाचा नकाशा, साचलेला गाळ, कचरा, वाढलेली झाडांची मुळे, पाण्यात पडलेले दगड आदींची नोंद घेण्यात येणार आहे. मेनहोलची उंची वाढवणे, काटेरी कुंपण लावणे, नहरीच्या अंतर्गत भागात पाणीपुरवठा करणारे लाखो भूमिगत झरे आहेत त्यांना परत सुरू करण्यास भिंतीची स्वच्छता करणे, धोबीघाट बंद करणे, दूषित पाणी थांबवणे आदी कामे केली जातील. एकूणच नहरीचे ‘स्कॅनिंग’ केले जाणार आहे.

सर्वेक्षणाचे व्हिडिओ शूटिंग
नहरीतील पाण्याची चोरी होत असेल आणि ऐतिहासिक वारशाला धोका पोहोचवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. नहरीमधून पाणी उपसा करणारे मोटारपंप जप्त करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व त्यांचे सहकारी, एमटीडीसी, पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी, तलाठी, डॉ. रमजान शेख, वास्तुविशारद देशपांडे लवकरच सर्व्हे करणार आहेत. मनपातर्फे त्याचे व्हिडिओ शूटिंग केले जाईल.’’ - एम.डी. सोनवणे, मनपा शहर अभियंता

तीन मीटरचे सुरक्षाकवच हवे
नहर सुरक्षित राहावी यासाठी तिच्या दोन्ही बाजूंनी 3 मीटर जाडीचे सुरक्षाकवच असावे. नहर परिसरात वस्ती उभारणे, घरांचे बांधकाम आणि वृक्ष लागवडीस परवानगी देऊ नये, असा पर्याय विलास जाधव यांनी सुचवला. त्याला सर्वानुमते संमती दर्शवण्यात आली.