आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नहर-ए-अंबरीचा निर्णय दोन दिवसांत घेणार; आयुक्त हर्षदीप कांबळे यांची ग्वाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नहर-ए-अंबरीच्या पुनरुज्जीवनासाठी शहरातील आमदारांनी कंबर कसली आहे. आमदार प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांनी महापालिका आयुक्त हर्षदीप कांबळे यांना पत्र लिहिले असून नहर-ए-अंबरीच्या दुरुस्तीचा समावेश दुष्काळी कामांत करावा आणि जनतेला सध्या जेवढे पाणी मिळू शकते तेवढे तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना केल्या आहेत. या पत्रांची गंभीर दखल घेत आयुक्तांनीही पुढील दोन दिवसांत नहरीबाबत निर्णय घेणार असल्याचे दै. ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

आमदार तनवाणी यांनी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात, तर जैस्वाल यांनी एक मार्च रोजी पालिका आयुक्त डॉ. कांबळे यांना पत्र पाठवले आहे. दुष्काळी स्थितीमध्ये नहर-ए-अंबरी शहरवासीयांना वरदान ठरू शकते. त्यामुळे नहरीच्या मेनहोलवर करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्याचे काम हाती घेण्यात यावे, ज्या ठिकाणी नहरीची तोडफोड करण्यात आलेली आहे तिथे दुरुस्ती करावी आणि शक्य होईल तेवढे पाणी लोकांना तूर्त उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना आमदार तनवाणी यांनी केल्या आहेत. आमदार जैस्वाल यांनी पत्रात म्हटले आहे की, नहर किती किलोमीटरपर्यंत सुरक्षित आहे याबाबत सव्र्हे करून चाचपणी करावी. नहरीची दुरुस्ती दुष्काळी काम म्हणून तातडीने हाती घेण्यात यावी.

नहरीवर जलकुंभाचा पर्याय
नहरीच्या मेनहोलवरील अतिक्रमण काढण्यास तांत्रिक अडचणी आल्या अथवा विलंब लागत असेल तर जिथपर्यंत नहर सुरक्षित असेल तिथे पाणी शुद्धीकरणाची टाकी उभारून पाणी साठवावे. या जलकुंभापासून नवी पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा करता येतो काय हा पर्याय तपासावा, असा पर्याय आमदार जैस्वाल यांनी दै. ‘दिव्य मराठी’जवळ बोलून दाखवला. दरम्यान, नहरीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन वॉटर केअर फोरमने बुधवारी विभागीय आयुक्तांना दिले.

आज होणार बैठक
नहरीची दुरुस्ती, देखभालीसाठी त्वरित निधी उपलब्ध व्हावा आणि शक्य तेवढय़ा लवकर दुरुस्तीचे काम सुरू व्हावे यासाठी विभागीय आयुक्त संजीवकुमार जयस्वाल यांनी उद्या (8 मार्च) वॉटर केअर फोरमसोबत बैठक आयोजित केली आहे. शहरातील खासदार, सर्व आमदार आणि पुरातत्त्व विभागासह संबंधित सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी फोरमने केली आहे.
-सुभाष झांबड, सदस्य, वॉटर केअर फोरम

दोन दिवसांत निर्णय घेतो
आमदार प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांनी नहर-ए- अंबरीच्या संवर्धनासाठी मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. त्या आशयाचे निवेदन मला मिळाले आहे. याविषयी अभ्यास करून योग्य तो निर्णय दोन दिवसांत घेणार आहे.
-डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त