आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nahar e Ambari News In Marathi, National Research Labrotary, IIT Pawai

ऐतिहासिक नहर-ए-अंबरीचा र्‍हास, संवर्धनावर दिल्लीत होणार संशोधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकज कहाळेकर यांनी नहरीतील क्षार आणि वनस्पतींचे नमुने घेतले. - Divya Marathi
पंकज कहाळेकर यांनी नहरीतील क्षार आणि वनस्पतींचे नमुने घेतले.

औरंगाबाद - चारशे वर्षे जुन्या नहर-ए-अंबरी या पाणीपुरवठा यंत्रणेचे संवर्धन व्हावे यासाठी एका तरुण संशोधकाने राष्ट्रीय स्तरावर संशोधन सुरू केले आहे. नहरीच्या आत वाढलेल्या वनस्पती आणि क्षारांमुळे नहरीचे आयुष्य कमी झाले आहे. या घटकांचे उच्चाटन करून नहरीचे जतन करता यावे आणि पुरेसे पाणी लोकांना मिळावे यासाठी पंकज कहाळेकर या संशोधकाने नमुने घेतले असून लखनऊची नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी आणि पवईच्या आयआयटीमध्ये ते पाठवले आहेत. नहरीतील नमुन्यांच्या रासायनिक, जैविक पृथक्करणाच्या दोन स्वतंत्र अहवालांच्या आधारावर हे संशोधन होणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मेमध्ये दिल्लीत या विषयावर प्रेझेंटेशन होणार आहे.


मूळचे औरंगाबाद येथील, परंतु दिल्लीच्या नॅशनल म्युझियम संस्थेसाठी काम करणार्‍या पंकज कहाळेकर या पुरातत्त्व संशोधकाने सहा एप्रिल रोजी नहर-ए-अंबरीत उतरून क्षार आणि वनस्पतींचे नमुने घेतले. नैसर्गिक जलस्रोतातून नहरीत येणारे क्षार आणि पाण्यात वाढणार्‍या वनस्पतींमुळे नहरीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. नहरीच्या भिंतीच्या आतील बाजूंवर क्षारांचे स्तर जमल्याने प्लास्टर उखडले आहे. हे असेच सुरू राहिले तर नहर नष्ट होऊ शकते. ती नष्ट होऊ नये यासाठी कहाळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. वॉटर केअर फोरमचे संस्थापक व आमदार सुभाष झांबड आणि सदस्य अतुल शहा यांनी या कामी कहाळेकर यांना या कामी मोठी मदत केली आहे. नहरीत उतरण्यासाठी आवश्यक असलेली महापालिकेची परवानगी त्यांनी मिळवून दिली. मे महिन्यात दिल्ली येथे होणार्‍या सादरीकरणास झांबड उपस्थित राहणार आहेत.


नहरीच्या र्‍हासाची कारणे शोधणार
0नहरीच्या र्‍हासासाठी कारणीभूत ठरणार्‍या जीवाणूंचा अभ्यास करणार
0कोणत्या प्रकारचे क्षार प्लास्टर नष्ट करीत आहेत याचे रासायनिक विश्लेषण करणार
0संशोधनाचा उद्देश संवर्धन आणि विकास करणे
0संशोधनात नष्ट होणारे प्लास्टर कसे वाचवता येईल यावर उपाय शोधणार
0नहरीत वाढलेल्या वनस्पतींचे उच्चटन कसे करता येईल यावर उपाय
0पाणी वहन क्षमता वाढवून पाणीपुरवठा कसा करता येईल याचा अभ्यास
0रोमच्या धर्तीवर जलपर्यटन शक्य आहे का याची चाचपणी