आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्षवेधी: 44 हजार लोकांची पाण्याची गरज भागवू शकणार्‍या प्राचीन नहर-ए-अंबरीला घरघर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निजामशाहीचा सरदार मलिक अंबर याने सुमारे 400 वर्षांपूर्वी फतेहनगर (औरंगाबाद) येथील अडीच ते तीन लाख लोकांना पाणी पुरेल एवढी क्षमता असलेली नैसर्गिक स्रोतांचा वापर करून कलात्मक पद्धतीने खैर-ए-जारी (नहर-ए-अंबरी नंतर लोकांनी दिलेले नाव) बांधली. औरंगाबाद शहरात यंदा तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. प्राचीन पाणीपुरवठय़ाचा अत्युत्तम नमुना असलेल्या ‘नहर ए अंबरी’लाही घरघर लागली आहे. महानगरपालिका आणि पुरातत्त्व खात्याचेही कमालीचे दुर्लक्ष असलेली ही नहर संरक्षित केली तर शहरातील टंचाईचा भीषण प्रश्न सुटू शकेल. हाच विचार करून ‘दिव्य मराठी’च्या रिसर्च टीमने नहरीच्या उगमस्थानापासून ते शेवटच्या टोकापर्यंत पावणेतीन किलोमीटर पसरलेल्या जाळय़ाची पाहणी केली. या रिसर्चनंतर असे निदर्शनास आले की, पूर्वी अडीच-तीन लाख लोकांना पाणी पुरविणार्‍या नहरीमध्ये आजही तेवढीच क्षमता आहे. मात्र लोकांचे अज्ञान आणि प्रशासनाच्या औदासीन्यामुळे तोडफोड, अतिक्रमणासारखे गैरप्रकार केलेले आहेत. तथापि, आजही नहरीतून 20 लाख लिटर पाणी दररोज उपलब्ध होऊ शकेल अशी आशादायक स्थिती आहे. हे पाणी दर तीन दिवसाआड उपसल्यास शहरातील 44 हजार 445 नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल.

निजामशाहीचा सरदार मलिक अंबर (1547-1629) याने औरंगाबादेतील नागरिकांना घरापर्यंत पाणी मिळावे, यासाठी 1618 मध्ये नहर ए अंबरी ही प्राचीन पाणीपुरवठा यंत्रणा विकसित केली होती. कारण, येथे बारमाही पाणीपुरवठा करणारी मोठी नदी किंवा तलाव नव्हता. ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी त्याने सायफन पद्धतीचा वापर केला. अतिशय कल्पक पद्धतीने बांधलेली ही नहर अतिक्रमण, बांधकामामुळे ठिकठिकाणी उद्ध्वस्त, खंडित झाली आहे. तथापि, ही नहर हर्सूल, जटवाडा, कटकटगेट येथे काही कुटुंबांची तहान भागवत आहे.

औरंगाबादच्या उत्तरेस जोबन हिलच्या पायथ्याखाली असलेल्या सावंगी तलावाच्या उत्तरेकडे या नहरीचा उगम आहे. विठ्ठल शेळकेच्या शेताजवळ असलेल्या पहिल्या मेनहोलद्वारे नहर प्रत्यक्ष पाहण्यास मिळते. सावंगी तलाव, यासीन नगर, फुलेनगर, अंबर पॅरामेडिकल कॉलेज, हर्सूल गाव, जहांगीर कॉलनीजवळील औताडेंचे शेत, हसरूल जेलच्या पाठीमागील सवेरा पार्क, एकतानगर, जटवाडा रोडवरील जेलच्या अधिग्रहित जागेतून, सिडको एन-13 मधील डी आणि सी सेक्टर, हडको कॉर्नर कब्रस्तानमार्गे ती ताज हॉटेलसमोरील गायमुखापर्यंत येते. त्या पुढे जुन्या औरंगाबादमध्ये नहरीचे जाळे पसरले आहे.

पहिले मेनहोल नऊ फूट बुजले : प्रख्यात इतिहासतज्ज्ञ, नहर-ए- अंबरीचे संशोधक डॉ. रमजान शेख यांनी 1980 मध्ये नहरीचा उगम, वापर आदींचा सखोल अभ्यास केला. त्या वेळी त्यांना हर्सूलसावंगी येथील पहिले मेनहोल (उगमस्थान) चाळीस फूट खोल असल्याचे आढळले होते. ‘दिव्य मराठी’च्या रिसर्च टीमने याच मेनहोलची सध्याची अवस्था अभ्यासली. दोरीच्या मदतीने खोली मोजली तेव्हा ती 31 फूटच असल्याचे निष्पन्न झाले. दगड, माती आणि कचर्‍यामुळे हे मेनहोल नऊ फूट बुजले आहे. त्यातील पाण्याचा प्रवाहही आटला आहे. मात्र, मेनहोलमध्ये ओलावा आहे.

नहरीची रचना आणि वैशिष्ट्य : नैसर्गिक स्रोतांचा कलात्मक पद्धतीने वापर केलेला नहर-ए-अंबरी हा प्राचीन पाणीपुरवठय़ाचा अप्रतिम नमुना आहे. कमानाकृती नहर अडीच ते तीन फूट रुंद आणि सात ते आठ फूट उंच आहे. तिचा तळभाग अडीच ते तीन फूट रुंद आहे. तिच्यात जागोजागी झर्‍यांचे पाणी मिसळावे, अशी रचना केली असल्याचे आढळले. नहरीचा तळ कठीण खडकात कोरलेल्या नालीप्रमाणे आहे. बाजूच्या भिंती वीट आणि प्राचीन काळी किल्ले बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या चुन्याने बांधल्या आहेत. हे बांधकाम आजही मजबूत आहे.

तोडफोड, अतिक्रमण केलेली ठिकाणे अशी

1] अंबर पॅरामेडिकल कॉलेजच्या पाठीमागील भागात नहरच्या आसपास आणि नहरीवरही बांधकाम करण्यात आले आहे.
2] हसरूल गावातील कल्याण औताडेंच्या शेतातून जाणार्‍या नहरीवर 20 ते 25 फुटांचा हौद बांधण्यात आलेला आहे. या हौदात आजही सुमारे तीन फूट पाणी आहे.
3] सवेरा पार्क येथील मशीद कंपाउंडमधील तीनपैकी एका मेनहोलची तोडफोड करण्यात आली आहे. एका मेनहोलमध्ये चार ते पाच फूट पाणी आहे. या परिसरात पाण्याची दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिक दोरी-बकेटच्या साहाय्याने पाणी उपसा करीत आहेत. मात्र, या पाण्याची मोजदाद करणारी यंत्रणा नाही. एकीकडे टंचाई असताना दुसरीकडे दिवसभर सुरू असलेल्या या प्रवाहातून हजारो लिटर पाणी उपसले जात आहे.
4] मशिदीच्या बाहेरील भागात असलेले मेनहोल तोडून दगड आणि मातीने तो बुजवण्यात आला आहे.
5] त्यापुढे निजाम सरकारच्या काळात 1931 मध्ये नहरीच्या 75 व्या मेनहोलवर बसवण्यात आलेले पंप हाऊस आहे. येथे 10 हॉर्स पॉवरचा एक पंप आहे. 1985 पर्यंत या पंपातून हर्सूल कारागृहातील संपूर्ण कैदी, अधिकारी-कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना पाणी पुरवले जात होते. आजही अत्यल्प का होईना पाणी उपलब्ध होते.
6] एकतानगरमधून गेलेल्या या मेनहोल क्रमांक 76 च्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणकर्त्यांनी बांधकाम केले आहे.
7] त्यापुढे जटवाडा रोडपर्यंतच्या तीन मेनहोलला छिद्र करून पाणी चोरी होत आहे.

100 मेनहोल
नहरीची लांबी 2.75 मैल आहे. या नहरीत उतरता यावे, तसेच नहरीत स्वच्छता व साफसफाई करता यावी म्हणून 100 ते 200 फुटाच्या अंतराने नहरीवर 100 मेनहोल बांधण्यात आले आहे. पूर्वी शत्रुंना हे मेनहोल दिसू नये म्हणून मेनहोलचे मुख बंद करून ते मातीने झाकले होते. मात्र, 1931 नंतर निजाम सरकारच्या वॉटर वर्क्‍स डिपार्टमेंटद्वारे हे मेन होल उघडून त्यावर चेंबरप्रमाणे जमिनीपासून 6 ते 7 फूट उंच बांधकाम करण्यात आले.

16 मेनहोल गेले कुठे ?
दिव्य मराठी चमूने शंभर मेनहोलचा अभ्यास केला. हर्सूल जेलच्या पाठीमागील भागात 75 व्या मेनहोलवर पंपहाऊस आहे. तेथून पुढे गायमुखापर्यंत मेनहोलची मोजणी केली असता उर्वरित 25 पैकी फक्त 9 मेनहोल पाहणीत आढळून आले. हे 16 मेनहोल गेले कुठे याचा तपास घेणे गरजेचे आहे.

मोडक्या स्थितीतही दररोज 20 लाख लिटर पाणी
नहरची तोडफोड झाली. सप्टेंबर-ऑक्टोबर 2012 मध्ये या नहरीतून दोन एमएलडी (20 लाख लिटर) पाणी उपलब्ध झाले. चांगला पाऊस झाला असता तर मार्च-एप्रिलपर्यंत पाणी मिळाले असते. दुरुस्ती व सफाई केल्यास ही क्षमता दुपटीने वाढेल.
एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता, मनपा

सध्याची अवस्था ?
सध्या नहर मार्गावर वसाहती उभ्या आहेत. ग्रामपंचायत, नगर परिषद, मनपा प्रशासनाने बांधकामाची परवानगी देताना नहरींच्या संरक्षणाचा मुद्दा नजरेआड केला. लोकांनाही त्याचे महत्त्व कळले नाही. परिणामी गायमुखाजवळील कब्रस्तान अणि त्यापुढेही नहरींची मोडतोड झाली. त्यावर बांधकामेही करण्यात आली. काहीजणांनी अतिक्रमण करीत संरक्षित भिंतींच्या आत मेनहोल घेतले. काहींनी मेनहोलची मोडतोड करीत ते उद्ध्वस्त केले, तर काही जणांनी मेनहोलवरच विजेचे पंप लावून पाणी चोरी सुरू केली आहे. याकडे मनपा आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष नसल्याने ही पाणीचोरी बिनबोभाट सुरू आहे.