आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naher A Ambari Will Become Heritage Of Water Supply

औरंगाबाद शहरातील नहर-ए-अंबरी होणार ‘हेरिटेज पाणीपुरवठा’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- औरंगाबाद शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असलेली नहर- ए-अंबरी पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. नहरीचे जतन करण्यासाठी शासन गांभीर्याने विचार करीत असून योजनेला ‘हेरिटेज पाणीपुरवठा’ असे नाव देणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.

नहर यंत्रणेकडे महापालिका व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना एम.एम. शेख, सतीश चव्हाण, सुरेश नवले, संजय दत्त यांनी मांडली. शहरात 400 वर्षांपूर्वी पाणीपुरवठ्यासाठी नहर-ए-अंबरी ही यंत्रणा उभारण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत मनपा व सरकारचे दुर्लक्ष झाल्याने ही उपयुक्त यंत्रणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या दुष्काळाच्या समस्येवर ही पूरक यंत्रणा ठरू शकते, असा दावा करत सदस्यांनी लक्ष वेधले.

राज्यमंत्री जाधव म्हणाले, मलिक अंबर या सुभेदाराने 400 वर्षांपूर्वी ही पाणीपुरवठा व्यवस्था उभारली. ठरावीक लोकसंख्येला ती पुरेशी होती. यंदा पावसाअभावी 8 महिन्यांपासून नहरीतून पाणीपुरवठा बंद आहे. दोन एमएलडी क्षमतेची योजना सध्या बंद आहे. हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने यावर स्यूमोटो याचिका दाखल करून घेतली असून, अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यावर 24 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, ती अहवाल सादर करणार आहे. तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय व पालिका अधिकाºयांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.