आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nahik Road Corporater Dhage Birthday Celebration

अन् अभिषेक ठरला 'बोल बच्चन' , रसिकांचा भ्रमनिरास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - आता येणार. नंतर येणार म्हणून अभिनेता अभिषेक बच्चनला जवळून बघण्यासाठी लहान-मोठय़ांसह तरुण-तरुणींनी नियोजित वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी खचाखच गर्दी केली. दोन तास ताटकळल्यानंतर अभिषेक येणार नसल्याचे समजल्यावर सगळ्यांच्याच अपेक्षांवर नाराजीचा ‘अभिषेक’ झाला.

दुर्गामाता देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त संस्थानच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संस्थानचे अध्यक्ष, नगरसेवक शैलेश ढगे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श, गुणवंतांच्या गौरव सोहळ्यासाठी अभिषेक बच्चन आणि मोहम्मद सर्फराज एहसानला निमंत्रित करण्यात आले होते. हे दोघे फिरकले नाहीतच; पण कार्यक्रमाची परवानगी घेतलेली नसल्याने पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनीदेखील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर, उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनीही व्यासपीठावर जाणे टाळले. या कार्यक्रमाच्या गर्दीमुळे जुना सायखेडा रस्ता ठप्प झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता असताना जवळची जागा मिळाल्यास अभिषेकला जवळून बघता येईल म्हणून चाहत्यांनी सायंकाळी 6 वाजेपासून कार्यक्रमस्थळी गर्दी केली. तास-दोन तासानंतरही अभिषेकचे आगमन होत नसल्याचे लक्षात येताच उपस्थितांची चलबिचल सुरू झाल्याने मुख्य अतिथींशिवाय ऐनवेळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सुरू केलेला कार्यक्रम थोडक्यात आटोपता घेऊन संयोजक शैलेश ढगे यांनी माईकचा ताबा घेतला. दिलगिरी व्यक्त करून अभिनेत्याची कमी नवरात्रोत्सवात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

आरोप, आश्वासन अन् संकेत

गर्दी जमवण्यासाठी हा जुना फंडा वापरल्याचा तरुण-तरुणींचा आरोप.

उपस्थितांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन संयोजकांनी कार्यक्रम आवरता घेतला.

ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सवात अभिषेकला आणण्याचे आश्वासन.

कार्यक्रमाची परवानगी नसल्याने पोलिसांनी कारवाईचे संकेत दिले.

यापूर्वी या अभिनेते, अभिनेत्रींची हजेरी
शैलेश ढगेंचा वाढदिवस व नवरात्रोत्सवात यापूर्वी सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, झीनत अमान, सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे, श्वेता शिंदे, मीता सावरकर, सुकन्या कुलकर्णी, पूजा देवकर, मिलिंद गुणाजी, हेमंत बिर्जे, मकरंद अनासपुरे, पृथ्वी, अंकुश चौधरी, विजय कदम, मोहन जोशी, रवींद्र बेर्डे, प्रमोद पवार असे एकास एक सिनेकलावंतांनी हजेरी लावून चाहत्यांना आनंद दिलेला आहे. जाहीर झाल्यानंतर अभिनेता, अभिनेत्रीने कार्यक्रमाला दांडी मारण्याचा कटू प्रसंग यापूर्वी कधी आलेला नव्हता. मोहम्मद सर्फराज एहसानला टाइफॉईड झाल्याने अभिषेक येऊ शकला नसल्याचे कारण सांगण्यात येत होते.

नोटीस बजावणार
या कार्यक्रमाची परवानगी घेतलेली नाही. परवानगीविना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन व वाद्य वाजविल्याप्रकरणी संयोजकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. यापुढे चूक झाल्यास कठोर कारवाई करणार आहे. कोंडिराम पोपेर, वरिष्ठ निरीक्षक, उपनगर पोलिस ठाणे