आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 लाख पाउंडांच्या लालसेपोटी खत्रींनी गमावले 8 लाख रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कोका कोला कंपनीचे 50 लाख पाउंडांचे बक्षीस लागल्याच्या भूलथापांना बळी पडत आर्टिस्ट संजय खत्री यांनी आठ लाख रुपये विदेशी भामट्यांना दिले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार देत एका नायजेरियन भामट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार आज (25 जून) सकाळी 11.30 वाजता घडला.

संजय किसनराव खत्री (52, रा. सी-3, अमेय बिल्डिंग, अरिहंतनगर) यांचा मुलगा अमेय याच्या मोबाइल क्रमांकाला कोका कोला कंपनीचे 50 लाख पाउंडांचे बक्षीस लागल्याचा मेल 20 मे 2013 रोजी विदेशी भामट्यांनी त्याला पाठवला. हे बक्षीस मिळवण्यासाठी वैयक्तिक माहिती कळवावी, असेही भामट्यांनी त्यात नमूद केले होते. यानंतर खत्रींनी वैयक्तिक माहिती भामट्यांना मेल केली. पुन्हा भामट्यांनी मेलवर संपर्क साधत पैसे घेऊन आमचा प्रतिनिधी फिलीप रिचर्ड (पहिला भामटा) दिल्लीला रवाना होत आहे. तेथे आल्यानंतर तो संपर्क साधेल, त्याला सहकार्य करा, असे खत्रींना कळवले. या वेळी त्याच्या पासपोर्टची प्रतही त्यांनी मेल केली.

भामटे मागायचे आणि खत्री पैसे द्यायचे!
21 मे रोजी रिचर्ड दिल्लीला आला. त्याने तेथून मोबाइलद्वारे खत्रींशी संपर्क साधला. बक्षिसाची रक्कम सीमाशुल्क विभागातून सोडवण्यासाठी 19 हजार 500 रुपयांची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार खत्रींनी रिचर्डच्या एसबीआय खात्यात रक्कम हस्तांतरित केली. दुसर्‍या दिवशी रिचर्डने पुन्हा फोन करत रिझर्व्ह बँकेतून बक्षिसाची रक्कम भारतीय चलनात बदलण्यासाठी 65 हजार रुपये आणा, असे सांगितले. त्यामुळे खत्रींनी पुन्हा 65 हजार रुपये रिचर्डच्या बँक खात्यात भरले. दोन दिवसांनंतर फोन करून आता ‘सीओटी कोट’साठी एक लाख 25 हजार रुपयांची गरज आहे असे रिचर्डने सांगितले. खत्रींनी पुन्हा रक्कम जमा केली. रिचर्डने पुन्हा फोन करून दिल्लीतील प्रतिनिधी आता पैसे घेऊन निघाला असून, तुमच्याकडे आल्यानंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी आणखी काही रकमेची आवश्यकता आहे. त्यामुळे विमानाचे तिकीट आणि इतर खर्चासाठी तीन लाख रुपये द्या, अशी मागणी केली.

सांगितल्याप्रमाणे 29 मे रोजी प्रिंग ओमेरो (दुसरा भामटा) सकाळी 8.30 वाजता खत्री यांच्या घरीच आला. त्याने सुटकेसमधील नोटांच्या बंडलातून डॉलरच्या आकाराच्या दोन कोर्‍या काळय़ा रंगाचे कागद काढले. बाटलीतून काढलेला रासायनिक द्रवपदार्थ काळय़ा कागदांना लावून हातचलाखी करत त्या खर्‍या असल्याची खत्रींना थाप मारली. नोटांना द्रव लावून दोनपैकी एक नोट अमेयकडे दिली. त्या भामट्यासोबत अमेय प्रोझोन मॉलमध्ये गेला. तेथे पासपोर्ट दाखवून डॉलरपोटी 5 हजार 386 रुपये मिळवले. तेव्हा खत्री कुटुंबीयांचा या भामट्या टोळीवरील विश्वास आणखी दृढ झाला आणि त्यांनी पैसे देण्याचा सपाटा चालूच ठेवला.

भामट्याला घरातच पकडले
सोमवारी (25 जून) सकाळी 7.20 वाजता मार्क ओबी पीटरने (तिसरा भामटा) अमेयला फोन केला. प्रिंट्रॅव्हलजवळ आल्याचे त्याला सांगितले. त्यानुसार सकाळी 7.40 च्या सुमारास अमेय पीटरला (रा. आकारा, देश घाना) घेऊन घरी आला. पासपोर्ट दाखवत त्याने सुटकेसमधील दोन काळ्या नोटा काढल्या आणि गरम पाणी मागितले पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळून तो नोटांना लावण्याचा बहाणा केला. तसेच बनावट नोट (डॉलर) काढून काळय़ा नोटेच्या जागी टाकत असताना त्याची हातचलाखी खत्रींच्या निदर्शनास आली.

भामट्याने पदार्थ लावून या नोटा 24 तास फ्रिजमध्ये ठेवा तसेच केमिकलसाठी आणखी दोन लाख रुपये लागतील असे सांगितले. मग मात्र खत्रींनी त्याला संपूर्ण नोटा खर्‍याखुर्‍या करून दाखव, असा दम भरला. तेव्हा भामटा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने खत्रींनी त्याला घरी पकडून ठेवले. गुन्हे शाखा पोलिसांना याची माहिती दिली.

यानंतर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, गौतम गंगावणे, गोरख चव्हाण, प्रकाश गायकवाड, विलास काळे, किशोर काळे आणि शेख नवाब यांनी भामट्याला पकडले. त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.