आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात नामांतर शहीद स्मारक उभारणार, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नामांतर लढ्यातील शहिदांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने शहिदांचे स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी एक कोटीची तरतूद करू, अशी घोषणा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार लढ्यात योगदान देणाऱ्यांचा आणि शहीद कुटुंबीयांतील प्रतिनिधींचा शनिवारी (१४ जानेवारी) विद्यापीठातर्फे गौरव करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. 

या लढ्यात सहभागी कार्यकर्ते, शहिदांबद्दल आमच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. ‘नामांतर लढा-शहीद स्मारक’ लवकरच निर्माण करण्यात येईल. त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात येणार असून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव घेण्यात येईल. नामांतर लढ्यातील गंगाधर गाडे, प्राचार्य राजाराम राठोड, कामगार नेते सुभाष लोमटे, बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, अॅड. रमेशभाई खंडागळे, माजी सभापती रतनकुमार पंडागळे, पत्रकार स. सो. खंडाळकर (सर्व औरंगाबाद), प्रा. एस. के. जोगदंड (अंबाजोगाई) आदी नेत्यांचा सत्कार करण्यात आला. त्याशिवाय शहीद गौतम वाघमारे यांचे बंधू शशिकांत, शहीद पोचीराम कांबळे यांच्या पत्नी धोंडाबाई शहीद जनार्दन मवाडे यांच्या पत्नी ताईबाई, मुलगा डॉ. विवेक यांचाही सत्कार करण्यात आला. 
 
तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या वाहन ताफ्यासमोर जिवाची बाजी लावणाऱ्या संगीताबाई, जमुनाबाई गायकवाड (मुलगी आई), राहीबाई जावळे (बीड) नामांतर लढ्यात पायावर गोळी लागलेल्या सय्यद गफार (अंबाजोगाई) यांनाही गौरवण्यात आले. उपस्थितांनी उभे राहून शहीद लढ्यातील नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुहास मोराळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, वित्त लेखाधिकारी शंकर चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके आदींची उपस्थिती होती. भीमगीत स्पर्धेतील विजेत्यांना विविध परीक्षांमध्ये गुणवत्तापदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. 

प्रा.जोगेंद्र कवाडे आणि प्राचार्य वाहूळ यांची नाराजी : नामांतरासाठीनागपूर ते औरंगाबाद असा पायी लाँग मार्च काढणारे प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा गौरव करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला प्रतिक्रिया देऊन प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्याशिवाय नामांतराची पहिल्यांदा मागणी करणाऱ्या प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनीही ‘दिव्य मराठी’ कडे दिलेल्या प्रतिक्रियेत कुलगुरू डॉ. चोपडे यांच्यावर रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे मराठवाड्यातील नेतृत्व आपल्याकडे होते त्या वेळी आपणच १९७४ दरम्यान पहिल्यांदा सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे आपला विसर कसा पडला, असा सवाल त्यांनी केला. संघ परिवाराशी कुलगुरूंनी जवळीक ठेवल्यामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या कुलगुरूंनी राजकीय पाठिंब्यासाठी केलेला हा खटाटोप असल्याची भावनाही डॉ. वाहूळ यांनी व्यक्त केली.