आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namdev Gadekar News In Marathi, BJP, Raosaheb Danve, Divya Marathi

काँग्रेसचे गाडेकर भाजपच्या गळाला,खासदार दानवेंनी शोधला हरिभाऊ बागडेंचा पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे घमासान सुरू झाले असताना भाजपच्या गळाला एक बडा मासा लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री हरिभाऊ बागडे यांच्या नाराजीमुळे अडचणीत आलेल्या महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी नवा उपाय शोधला. त्यांनी गळ घातल्याने काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील नेते नामदेवराव पाटील गाडेकर हे भाजपच्या गोटात दाखल झाले. या घटनेने औरंगाबादमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.


औरंगाबादच्या जिमखाना क्लबमध्ये गाडेकर यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीतील 22 पेक्षा अधिक प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पत्रपरिषदेत पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा दानवे यांनी केली. त्यात राष्ट्रवादीचे सिल्लोड तालुक्यातील नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीरंग पाटील साळवे यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानास केवळ पंधरा दिवस शिल्लक असताना गाडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने विलास औताडे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांत असंतोष असल्याचे आजच्या प्रवेश सोहळ्यातून समोर आले आहे. प्रवेश सोहळ्याला प्रवक्ते शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष बापू घडामोडे, माजी महापौर भागवत कराड यांची उपस्थिती होती.


गटबाजीने त्रस्त : साळवे : जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गटबाजीने त्रस्त झाल्यामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याचे श्रीरंग पाटील साळवे यांनी सांगितले. खासदार दानवेंसोबत सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून जवळीक निर्माण झाली. सिल्लोड तालुक्यातील आपले चाहते व मित्रमंडळींचा प्रवेश 12 एप्रिल रोजी मोठय़ा प्रमाणावर करणार असल्याचे साळवे यांनी सांगितले.


तेजराव घोरपडे बदलले : प्रवेश सोहळा सुरू असताना व्यासपीठावर बसलेले काँग्रेसचे एक पदाधिकारी तेजराव घोरपडे यांनी भाजपत प्रवेश केल्याचे दानवे यांनी सांगताच घोरपडे यांनी प्रवेश करण्यास नकार दिला. आपणास अचानक व्यासपीठावर बसवण्यात आल्याचे घोरपडे यांनी सांगून काय विषय सुरू आहे. याची कल्पना नसून आपण प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आपणास गाडेकर यांनी भेटायला बोलावले व व्यासपीठावर बसवल्याचे त्यांनी सांगितले. यावर खासदार दानवे यांनी घोरपडेंशी पुन्हा एकदा चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ, असे जाहीर केले.


आम्हीही युती फोडू : काँग्रेस
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना-भाजपचे काही बडे पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी प्राथमिक बोलण्याच्या फेर्‍याही झाल्या आहेत. त्यामुळे केवळ युतीचे नेते फोडाफोडी करू शकतात, असे नाही. यापुढील काळात आम्हीही त्यांची फोडाफोडी करणार आहोत. काँग्रेसच्या जाहीर सभांमध्ये त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.


यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
माजी मंत्री तथा देवगिरी साखर कारखान्याचे चेअरमन नामदेवराव पा. गाडेकर, सिल्लोड येथील राष्ट्रवादीचे नेते श्रीरंग पा. साळवे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन पुंडलिक पांडुरंग मोरे, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक व अंधारीचे माजी सरपंच सदाशिव तायडे, फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिवाजी पाथ्रीकर, ‘सिद्धेश्वर’चे संचालक जयप्रकाश फकीरराव गोराडे, शिवाजीराव गाडेकर, फुलंब्री पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन शेजवळ, सिल्लोड पंचायत समितीचे माजी सभापती संतोषराव शिंदे, मंदाताई जनार्दन गाडेकर, देवगिरी कारखान्याचे संचालक अशोकराव सोळुंके, रमेश केशवराव साळुंके, ज्ञानदेव बाजीराव उकिर्डे, औरंगाबाद जि. प. चे माजी सभापती गोविंदराव भोजने, ‘सिद्धेश्वर’चे संचालक रामलाल दुधे, अशोक साबळे, संतोषराव गव्हाणे, साहेबराव मिरगे (सिल्लोड), नरेंद्र पाटील (सिल्लोड), माधवराव पाटील, गोपीनाथ पा. वाघ, नाथा काकडे, चंद्रशेखर साळवे (माजी सरपंच, वांगी).


मूळ घरी परतलो : गाडेकर
भाजपत आल्यामुळे मूळ घरात परतल्याची भावना असल्याचे गाडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, 1978 मध्ये मी राज्य मंत्रिमंडळात होतो. त्या वेळी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलो होतो. 35 वर्षे काँग्रेसमध्ये अपमान सहन केला. एका आमदारासह काँग्रेसमधील काही मंडळी देवगिरी कारखाना विक्री काढण्यासाठी दबाव आणत होती, असा आरोप गाडेकर यांनी केला. दबाव आणणार्‍यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरू असून घोटाळेबाजांना उमेदवारी देण्याचे सत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.


एकाच वेळी तिघांवर निशाणा
काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडताना दानवे यांनी स्वपक्षातील नाराज बागडेंनाही या माध्यमातून शह दिल्याचे बोलले जात आहे. ऐनवेळी खेळी करण्यात निष्णात असलेल्या दानवे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी फोडून आपल्या पक्षातील बागडेंना चांगलाच चकवा दिल्याची चर्चा होती.


बागडेंची उणीव भरून निघणार नाही : खा. दानवे
माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी केलेले पुण्य मोठे आहे. त्यांची उणीव कुठल्याही स्थितीत भरून निघणार नसल्याचे उद्गार खासदार दानवे यांनी काढले. बागडेंकडून आपण दररोज मार्गदर्शन घेतो. बागडे प्रचारात असल्याचे सांगताना ते नेमके कोठे प्रचार करीत आहेत, यासंबंधी मात्र खासदार दानवे काही सांगू शकले नाहीत. बागडे लवकरच प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.