औरंगाबाद - आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी सरसावलेले अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह अख्खे संत तुकोबाराय नाट्यगृह 2 मुलांची आई असलेल्या २२ वर्षीय शेतकरी विधवेच्या सवालाने नि:शब्द झाले. कारण आत्मकथनासाठी व्यासपीठावर आलेल्या करंजखेडा येथील कविता राऊत यांचे शब्द असे होते, ‘२८ जानेवारीला नवऱ्याने आत्महत्या केली. मला साडेचार वर्षांची मुलगी त्यापेक्षा लहान मुलगा आहे. स्वत:चे घर नाही, आई-वडील नाही, सासू-सासरेही नाहीत. त्यांनी असे करायला नको होते; पण केले. आता मी कसे जगू? मुलगा, मुलगी अन् मीच एवढेच आम्ही उरलो आहोत. आता मी बोलू शकत नाही.’
कविता यांना हुंदके आवरले नाहीत. हजारांपेक्षा जास्त शेतकरी तसेच नागरिक या सभागृहात होते. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्यासह हातात कॅमेरे घेऊन सरसावलेले छायाचित्रकार, पत्रकार सर्वच स्तब्ध अन् नि:शब्द झाले. कविता शहरात असती तर कदाचित तिचे अजून लग्नही झाले नसते. त्याच वयात तिच्या कपाळी वैधव्य आले. शहरी बाज परिचित नसतानाही तिने बोलण्याचे धारिष्ट्य दाखवले अन् जागरूक म्हणवल्या जाणाऱ्या सर्वांनाच मोठा सवाल विचारला.
मुलीला सोबत घेऊन व्यासपीठावर आलेल्या कविता या अवघ्या एकच मिनिट बोलल्या, पण पुढील पंधरा मिनिटे उपस्थित सर्व जण त्यांचाच विचार करत होते. दोन मुलांच्या पलीकडे तिचे विश्व नाही. ती कशी जगेल, असा सवाल प्रत्येकाच्या मनाने बाहेर जाताना उपस्थित केला.
अंभई (ता. सिल्लोड) येथील सरस्वती गणेश रहाटे या बोलण्यासाठी आल्या तेव्हाही असंख्य प्रश्न उपस्थित झाले. त्या म्हणाल्या, ‘माझ्या ह्यांनी जीवनाचा विचार केला नाही, आमचाही विचार केला नाही. मला मुले मुलगी आहे. मोठा मुलगा ११ वीत, तर लहान मुलगा सहावीत शिकतो. घरात आंधळी सासू आहे. राहण्यासाठी घर नाही, बँकेचे कर्ज आहे. काय करावं सुचत नाही. मुलांना कसे शिकवू, घरभाडे, लाइट बिल कसे देऊ, आंधळ्या सासूला कसे सांभाळू, मुलांसाठी काय करू?’ सरस्वती यांच्या या कथनावरही अनेक जण गहिवरून आले.
पैठण तालुक्यातील मंदाकिनी थोरात यांनी मदत घेतानाच यापुढे कोणाचे घर माझ्यासारखे होणार नाही यासाठी काय केले पाहिजे, यावर विचार करावा, असा सल्ला दिला. जाणारा जातो, पण आम्हाला आणखी संकटात टाकतो. त्यामुळे शासन किंवा अन्य कोणीही असेल सर्वांनी मिळून असे काही करा की कोणी शेतकरी आत्महत्या करणार नाही.
कवितांनी मांडली कैफियत
आत्मकथनासाठी व्यासपीठावर आलेल्या करंजखेडा येथील कविता राऊत यांचे शब्द असे होते, ‘२८ जानेवारीला नवऱ्याने आत्महत्या केली. मला साडेचार वर्षांची मुलगी त्यापेक्षा लहान मुलगा आहे. स्वत:चे घर नाही, आई-वडील नाही, सासू-सासरेही नाहीत. त्यांनी असे करायला नको होते; पण केले. आता मी कसे जगू? मुलगा, मुलगी अन् मी एवढेच आम्ही उरलो आहोत. आता मी बोलू शकत नाही.’
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय मदत सोहळ्यासाठी आले होते.