आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nana Patekar Commented On Villages Situation In Paithan

"अधिकारी कामच करत नसल्याने गावे दत्तक घेतो'- नाना पाटेकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- औरंगाबादहून पैठणला येण्यासाठी एक तास लागतो. पंधरा मिनिटांच्या रस्त्याला तासभर लागतो. यावरून तुम्ही येथे काय विकास केला हे दिसते. तुम्ही मतदारसंघाचा विकास करणार का, हात वर करून सांगा, असे नाना पाटेकरांनी सुनावताच आमदार भुमरेंनी हात वर केला. दरम्यान, ग्रामस्थांना हात वर करण्यास नाना पाटेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्या बोटाने मतदारांनी तुम्हाला निवडून दिले ते पुन्हा पाडू शकतात. तेव्हा विकास करा. अधिकारी-लोकप्रतिनिधी कामे करत नाहीत म्हणून आम्हाला गावे दत्तक घ्यावी लागतात, असेही नाना पाटेकर यांनी सुनावले.

नंतर नानांनी तहसीलदार किशोर देशमुख, गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी, कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन यांना थेट उभे करत लोकांची कामे होत नसतील तर "तुमचे काय काम ते तरी सांगा' म्हणत नानांनी अधिकाऱ्यांना पाच मिनिटे उभे केले होते.

पैठण तालुक्यातील कुतुबखेडा, दादेगाव, कौंदर ही गावे नाम फाउंडेशनने दतक घेतली. या कार्यक्रमासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे कुतुबखेडा येथे आले होते. कार्यक्रमाची नियोजित वेळ सकाळी १० ची होती; परंतु रस्ते खराब असल्याने नाना पाटेकर यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास तासभर उशीर झाला होता.

दरम्यान, मकरंद अनासपुरे यांनीही रस्त्याच्या प्रश्नावर आमदारांवर टोलेबाजी करत लोकांची वाहवा मिळवली. त्यावर आमदार भुमरे यांनी आपण तालुक्याच्या विकासासाठी व रस्त्यांसाठी किती निधी आणला याचा पाढा वाचणे सुरू केले. त्यावर मध्येच थांबवत नाना पाटेकर यांनी आमदार भुमरेंना सुनावले की, विकास करता येत नसेल तर मतदार तुम्हाला खाली खेचतील. लोकहो, लोकप्रतिनिधींसह अधिकारी काय काम करतात याकडे लक्ष द्या. हे लोक चांगले काम करत नसल्याने आम्हाला गावे दत्तक घ्यावी लागत आहेत.गावात विविध विकासकामांची उद्घाटने करण्यात आली. अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना पाहण्यासाठी नेत्यांसह ग्रामस्थांनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली.
शौचालयासाठी तुम्ही आर्थिक मदत करा
भुमरे तुम्ही शौचालयासाठी अनुदान द्या शासनाचे शौचालयासाठी १२ हजारांचे अनुदान गावपातळीवर दिले जाते. मात्र, बहुतांशी लोकांना शौचालयाचे अनुदान मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. भुमरे तुम्ही गावात स्वखर्चाने काही शौचालये बांधून द्या व काहींना १२ हजारांचे अनुदान द्यावे, असे मत सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी मांडले. या वेळी उपस्थितांनी त्यास भरभरून दाद दिली.