आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nana Patekar Folded Hand Before The Aurangabad Road

औरंगाबादच्या रस्त्यांना नाना पाटेकरांनी हात जोडले; महापालिकेची काढली जाहीर वाभाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील दयनीय रस्त्यांवरून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गुरुवारी महानगरपालिकेचे जाहीर वाभाडे काढले. ‘रस्त्यांवरून येताना मला वाईट वाटले. मनपा, सरकारने समन्वयाने हे काम करावे’, असे सांगत त्यांनी चक्क जिल्हाधिकारी विक्रम कुमार व विभागीय आयुक्त डॉ. संजीव जयस्वाल यांना हात जोडले.

पहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात नानाने विविध विषयांवर भाष्य करताना खास शैलीत मनपालाही घेरले. डॉ. जब्बार पटेल यांनी लघुपटांची स्पर्धा घेण्याची घोषणा भाषणात केली. त्याचा संदर्भ घेत नाना म्हणाले, ‘मी औरंगाबादचा असतो आणि लघुपट काढायचा असेल तर आजचे व सात वर्षांपूर्वींचे शहर मी दाखवेन. माझी महानगरपालिका आणि सरकारला विनंती आहे, की त्यांनी सामंजस्याने मार्ग काढावा.’

या रस्त्यांचे आधीच धिंडवडे निघत आहेत. आता नानाने मनपाला मान खाली घालायला लावली. या आधी एका ब्रिटिश नागरिकाचा येथील खड्डय़ात पडून पाय मोडला तेव्हा त्याने ब्लॉगवरून हा विषय जगभर नेला. आता नाना बोलले आणि प्रेक्षकांनीही कडाडून टाळ्या देत भावना कळवली.
काही तरी कराच..

जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे निर्देश करीत नाना म्हणाले, तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, मुलासारखे आहात, पण तुमचे कर्तृत्व खूप मोठे आहे. त्यामुळे काही तरी करा. सरळ होत नसेल तर आडवळणाने जा. कारण कायदे, नियम तुम्हाला माहीत असतात, तुम्हाला ते जास्त जमते.