आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध गावासाठी ‘तरुण अडवा, तरुण जिरवा’; नानांचा मंत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासनाने पाणी, विजेची सोय केली तर तरुण शेतीत नंदनवन फुलवतील. त्यामुळे यापुढे काळात गावांच्या समृद्धीसाठी तरुण अडवा, तरुण जिरवा, असा मंत्र प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी दिला. एमजीएममध्ये मंगळवारी (२६ जानेवारी) झालेल्या प्रकट मुलाखतीत ते म्हणाले की, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमागचं कारण कर्ज किंवा दुष्काळ नसून ‘माझ्या पाठीशी कुणीही नाही’ ही निराशेची भावना आहे. माणूस माणसापासून दूर गेल्याने ही भावना वाढली. राज्यकर्त्यांनी काय करायला हवं याचं चिंतन करणं आणि चुकांवर बोट ठेवणं व्यर्थ आहे. आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो ते करून दाखवणं, कुटुंबांना आधार देत जगण्याची नवी उमेद देणं आपल्या हाती आहे. तेच मी ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून करतो आहे.
राजेंद्र हुंजे यांनी घेतलेल्या मुलाखतीत नानांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, ‘नाम’चं काम सुरू केलं तेव्हा वाटलं होतं की, ते लवकर होऊन जाईल; पण आता हा यज्ञ आहे. मी शेवटपर्यंत करीनच; पण पुढच्या पिढीकडून मला फार अपेक्षा आहेत. हे काम फक्त मराठवाड्यापुरते करू नका, तर भारतातही ते करायचं आहे. जात-पात या भिंतीपलीकडचा माणूस पाहायला शिका. माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणूनच मरा.

‘आपल्याकडे हुंड्याच्या मागणीमुळे आत्महत्या केलेल्या महिला किंवा मुलींचे बाप दिसतात. तेव्हा हुंडा मागणाऱ्यासारखा षंढ माणूस कुणी असू शकत नाही, असे मला वाटते. तुमच्या मनगटात जोर असायला हवा. तुम्ही कमवा आणि सर्वांना सुखी ठेवा. तरुणांनो, हुंडा मागू नका आणि मुलींनो, हुंडा देऊन लग्न करू नका.’
मैं तो बचपन में ही नाना बन गया
‘कोहराम’ चित्रपटाच्या वेळी अमिताभ आणि मी सोबत काम करायचो. एकेदिवशी ते गाडीतून उतरले अन् सर्वांना मिठाई वाटू लागले. मी म्हणालो, ‘किस बात की मिठाई?’ तर म्हणाले, ‘मैं नाना बन गया’. मी लगेच म्हणालो, आपको ५५ साल लग गये नाना बनने में. मैं तो बचपन में ही नाना बन गया.... यावर संपूर्ण सभागृह खळखळून हसू लागले.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ तसेच ‘तरुण अडवा आणि तरुण जिरवा’ मंत्र अमलात आणला तरच गावं समृद्ध होतील. नवीन शेती पद्धती तरुणांनीच करायला हवी. शासनाला नावे ठेवण्यापेक्षा आपणच काम करावं, करून दाखवावं. शासनाने फक्त पाणी आणि विजेची सोय करावी.’

लोकसहभाग महत्त्वाचा
आताच्या सर्व परिस्थितीवर शाश्वत विकास हेच उत्तर आहे. पाणी संपलेलं नाही. फक्त गाळ वाढला आहे. बीडमधील गावं दत्तक घेतली आहेत.

पाणी कुठे मुरलंय
‘मराठवाड्यातले चार मुख्यमंत्री होऊन गेले, पण तुम्हा लोकांची पाण्याची चंगळ झाली नाही. कारण पाणी मुरलेय बरेच. आता एकमेकांची मदत करून समृद्ध व्हायच आहे.