आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरतीय मुलावर भाळली जपानी डॉक्टर, ओल्ड अॅज होममध्ये केले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय तरुण किंवा तरुणीने विदेशी व्यक्तीशी विवाह केल्याच्या हजारो घटना आहेत. मात्र, नांदेडच्या डॉ. चैतन्य भंडारे यांनी जपानच्या प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. आसुका योनेमोरी हिच्याशी केलेला विवाह सर्वार्थाने वेगळा ठरला. याचे कारण म्हणजे मातोश्री वृद्धाश्रमातील ११२ आजी-आजोबांच्या साक्षीने हा विवाह पार पडला. या विवाहात आलेल्या भेटवस्तूही नवदांपत्याने वृद्धाश्रमाला भेट दिल्या.

रविवारी सकाळपासूनच आश्रमात लगीनघाई सुरू होती. महिलांनी ठेवणीतील साड्या नवीकोरी पातळ, तर पुरुषांनी धोतर शर्ट घातले होते. आश्रमाच्या प्रांगणात रांगोळी आणि फुलांचा सडा पडला होता. हळूहळू ज्येष्ठ मंडळी शामियान्यात जमू लागली. एरवी कोणत्याही कार्यक्रमात मागे बसवल्या जाणाऱ्या वृद्धांसाठी समोरील खुर्च्या सजवून ठेवल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात गुलाबपुष्प होते. थोड्याच वेळात वर-वधू मंडपात आले. त्यांना पाहण्यासाठी सारेच डोळे लावून बसले होते. गोरीपान, बारीक डोळ्यांची, शुभ्र वस्त्रांतली जपानी गुडिया अर्थात डॉ. आसुका मंचावर आली. पाठोपाठ डॉ. चैतन्यही आले. पारंपरिक बौद्ध पद्धतीने भंतेजींनी त्रिशरण-पंचशील आणि मंगलअष्ट गाथा ग्रहण केली आणि हा विवाह झाला. ज्येष्ठांनी डोळे भरून हा विवाह मनात साठवला आणि तृप्त मनाने पानांकडे वळले.

मातोश्री वृद्धाश्रमात डॉ. चैतन्य भंडारे यांचा विवाह थाटात पार पडला छाया : अरूण तळेकर

नाेकरी आणि आसुका जपानमध्येच भेटली
नांदेडजिल्ह्यातील धर्माबादचे डॉ. चैतन्य यांचे १० वीपर्यंतचे शिक्षण धर्माबादला झाले. औरंगाबादेत बीएस्सी शिकले. मध्य प्रदेशात एमएस्सी केल्यानंतर गोव्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफीमध्ये वर्षे काम केल्यानंतर जपानची शिष्यवृत्ती मिळाली. जपानमध्ये २०११ मध्ये त्यांनी पीएचडी केली. तेथेच नोकरी नि आसुका मिळाली.

फ्लाइटमध्ये ठरला व्हेन्यू
डॉ.चैतन्य यांना नेहमीच काहीतरी वेगळे करायला आवडते. आपल्या प्रत्येक कृतीचा फायदा समाजाला व्हावा, असा त्यांचा उद्देश होता. ते म्हणाले, वडील पोलिस होते. निवृत्तीनंतर ते एकटे पडले. त्यांच्यासाठी डे केअर सेंटर सुरू करावे असा विचार मनात आला; पण शक्य झाले नाही. त्या दिवशी डॉ. आसुका आणि मी भारतात येत असताना ११ तासांची फ्लाइट होती. आम्ही लग्नाविषयी चर्चा करत होतो. एकदम मातोश्रीतील वृद्धांचे चेहरे डोळ्यांसमोर तरळले. ही कल्पना आसुकाला सांगितली आणि ती तत्काळ तयारही झाली.

...अन् पृथ्वीवर देव अवतरतात
जपानीमान्यतेप्रमाणे १६ ऑगस्टला पृथ्वीवर देव येतात आणि प्रत्येक शुभकार्याला आशीर्वाद देतात. म्हणूनच डॉ. आसुका यांची या दिवशी विवाह करण्याची इच्छा होती. त्यामुळे "मातोश्री'च्या वृद्धांच्या आशीर्वादात हा विधी पार पडला.