आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदी नंदकुमार घोडेले यांची निवड! लोणावळ्यात रंगली अभिरूप सर्वसाधारण सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आल्यानंतर श्रेष्ठींच्या आदेशानंतर ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांची महापौरपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याच अध्यक्षतेखाली जवळपास चार तास ही सर्वसाधारण सभा चालली. विशेष म्हणजे कोणताही गोंधळ न घालता सर्वच नगरसेवकांनी चक्क गांभीर्याने चर्चा केली!
वरील वर्णन वाचून वाचकांना धक्का बसू शकेल. पण हे खरे आहे. शिवसेनेचे निवडून आलेले २८ नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून लोणावळ्यातील कुमार रिसाॅर्ट््समध्ये तळ ठोकून होते. महापौर निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी ही लोणावळा सहल असली तरी त्यात नगरसेवकांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यातच ही अभिरूप सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती, त्यात घोडेले महापौर बनले होते. शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये यंदा नवीन चेहऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना महापालिकेचे कामकाज कसे चालते, तेथे बैठकांत कोणते विषय कसे मांडावेत याबाबत व मनपाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी नगरसेवकांनी कसे काम करणे अपेक्षित आहे हे सांगत कोणते विषय कसे मांडावेत, त्यांची तड कशी लावावी याचीही माहिती दिली.

यानंतर नव्या नगरसेवकांना, खासकरून महिलांना आत्मविश्वास यावा यासाठी अभिरूप सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. लोणावळ्याला जाईपर्यंत महापौरपदाच्या शर्यतीत असलेले व नंतर बाद झालेले नंदकुमार घोडेले या सर्वसाधारण सभेचे महापौर होते. आमदारपुत्र सिद्धांत शिरसाट उपमहापौर बनले. आयुक्तांच्या भूमिकेत स्थायी समितीचे मावळते सभापती विजय वाघचौरे वावरले. विरोधी पक्षनेतेपदी माजी नगरसेवक वीरभद्र गादगे यांची निवड करण्यात आली, तर सभागृह नेते म्हणून मनोज गांगवे यांनी काम पाहिले. तीन दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यानंतर आज सायंकाळी हे नगरसेवक औरंगाबादेत परतले. पण त्यांना घरी जाऊ देण्यात आले नाही. ते उद्या थेट महापालिकेतच दाखल होणार आहेत.

नागरिकांचे विषय
या सर्वसाधारण सभेत प्रत्येक नगरसेविकेला आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व नागरिकांशी संबंधित असे विषय देण्यात आले. प्रत्येक नगरसेविकेला तीन विषय देण्यात आले होते. त्याची तयारी करून घेऊन त्यांना या सभेत बोलायला सांगण्यात आले होते. या कामी त्यांना स्वत: महापौर घोडेले, माजी महापौर विकास जैन, राजू वैद्य या अनुभवींनी मार्गदर्शन केले.