आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर नारळीबागेतील रस्ता दुरुस्त झाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या रस्त्याला 30 दिवसांतच भगदाडे पडली, मात्र ती बुजवावी कुणी, यावरून मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागात वाद निर्माण झाले. डीबी स्टारने तपास करून पाठपुरावा केला. त्यामुळे अधिका-यांनी ठेकेदाराला आदेश दिले आणि रखडलेला नारळीबागेतील रस्ता अखेर दुरुस्त झाला.
गेल्या दोन महिन्यांपासून या नव्याको-या सिमेंट रस्त्यावरील खड्डे बुजवावेत म्हणून परिसरातील असंख्य नागरिक ठेकेदार, मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चकरा मारत होते; पण त्यांना कुणीही दाद देत नव्हते. चमूने हा प्रश्न उचलला व त्याचा कायम पाठपुरावाही केला. त्यामुळे अखेर ठेकेदार लक्ष्मण गि-हे, सुंदर गढवे यांनी 80 हजार रुपये खर्च करून या रस्त्याचे खड्डे बुजवले.
नारळीबागेतील संतोषीमाता मंदिराच्या परिसरात 100 मीटर अंतरापर्यत खड्डे, ओबडधोबड रस्ता आणि चिखल यामुळे चालणेही मुश्कील होत होते. मनपा क्षेत्रातील मूलभूत सुविधांच्या विकासकामांसाठी नगरविकास विभागाच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत नारळीबागेतील काही रस्त्यांसाठी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यातील या एका रस्त्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला, मात्र निकृष्ट काम केल्याने सिमेंट रस्ता तयार होऊनही त्याचे महिनाभरातच पार वाटोळे झाले होते. परिणामी या भागातील रहिवाशांना पूर्वीप्रमाणेच त्रास सहन करावा लागत असे. सव्वा ब्रास खडीने भरलेले ट्रॅक्टर या रस्त्यावरून जाताच तीन ठिकाणी मोठी भगदाडे पडली. यामुळे या भागातील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा व ठेकेदारांकडे रस्ता दुरुस्तीचा तगादा लावला, मात्र कुणीही दाद देत नव्हते. अखेर त्रस्त नागरिकांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. चमूने या रस्त्याची पाहणी करून 12 एप्रिल रोजी ‘30 वर्षांनंतर झालेल्या रस्त्याला पडली 30 दिवसांतच भगदाडे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर उपअभियंता अशोक घेवारे, तत्कालीन शाखा अभियंता अशोक जाधव, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत लोखंडे तसेच पालिकेचे उपअभियंता शेख खमर, शाखा अभियंता बी.के.परदेशी यांनी रस्त्याची पाहणी केली. अयोग्य प्रकारे मालाचा वापर, धम्मस न करता केलेले काम आणि बांधकामावर पाणी टाकण्यात केलेली हयगय यामुळे रस्ता उखडल्याचे समोर येताच उपअभियंता घेवारे यांनी ठेकेदार लक्ष्मण गि-हे व सुंदर गढवे यांना आधी रस्ता दुरुस्त करा, मगच बिल सादर करा, अशी तंबी दिली होती. त्यामुळे ठेकेदाराने पुन्हा 80 हजार रुपये खर्च करून या रस्त्याचे पॅचवर्क केले व लोकांचा मार्ग सुकर केला.