आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीत गुंड प्रवृत्तीची माणसे नारायण राणे यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपले असून काँग्रेसची खरी लढाई भाजपशीच आहे, असे सांगत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काँग्रेसला स्वबळावर सरकार स्थापन करण्याएवढे आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सगळी ओवाळून टाकलेली, गुंड प्रवृत्तीची माणसे राष्ट्रवादीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवार एम. एम. शेख यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी शिवसेना भाजपवर हल्ला चढवतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रमुख टार्गेट केले. मोदी धादांत खोटारडे असून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे गोडवे गाणे चुकीचे असल्याचे सांगत राणे म्हणाले, अमेरिकेत हे केले आणि ते केले, अशा तऱ्हेने सांगितले जात आहे की जणू याआधी कुणी पंतप्रधान अमेरिकेत गेलाच नाही. मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. एकही काम त्यांनी केले नाही, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसची खरी लढाई भाजपशीच असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसला किती जागा मिळतील, निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची मदत लागेल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्हाला कुणाची मदत लागणार नाही. स्वबळावर सरकार स्थापन करण्याएवढे आमदार काँग्रेसचे असतील, असा मला विश्वास आहे.

त्याआधी मेळाव्यात बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फायलींबद्दल अजित पवार यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेत राणे म्हणाले की, साडेचार वर्षे सोबत नांदलात ना, आमचे मंगळसूत्र घातले होते ना, मग तेव्हा का नाही आठवले? असा सवालही त्यांनी केला. मनमोहनसिंग सरकारने आणलेला औरंगाबादचा डीएमआयसी प्रकल्पही आपणच आणला, अशा डिंग्या मोदी मारत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी उमेदवार एम. एम. शेख, माजी महापौर सुदाम सोनवणे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, विनायक बोरसे, प्रभाकर मुठ्ठे पाटील, राजेंद्र दाते पाटील यांची उपस्थिती होती.