आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षपाती यंत्रणेमुळेच आरक्षणाची गरज, , खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतातील प्रशासकीय आणि न्याययंत्रणा पक्षपात करते, असे वारंवार समोर आले आहे. म्हणूनच आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. ही यंत्रणा नि:पक्ष असती तर आरक्षणाची गरजच राहिली नसती अन् कुणी अशी मागणीही केली नसती, असे ठाम मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरुवारी व्याख्यानासाठी ते आले होते. त्या वेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट देत अनेक मुद्द्यांवर त्यांची परखड मते मांडली. सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या उच्च वर्गासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याकरिता घटना दुरुस्ती केली पाहिजे, असेही ते म्हणाले. कोपर्डी हत्याकांड, मराठा क्रांती मोर्चा, आरक्षण, संसदीय कामकाज आणि अॅट्रॉसिटी अॅक्टच्या उपयुक्ततेसंदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
कुणाचाही मिंधा नव्हतो अन् भविष्यातही नसणार
भाजपच्या पाठिंब्यामुळे आपण खासदार झालो असून त्यामुळे भाजप, राष्ट्रीय सेवा संघात आपण प्रवेश केल्याची टीका काही जण करत आहेत. मात्र, त्यांनी कृपया समजून घ्यावे, राज्यसभा सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी माझी नियुक्ती केली आहे. अशीच नियुक्ती लता मंगेशकर, रेखा, सचिन, संभाजीराजे भोसले यांचीदेखील झालेली आहे. त्यांना काँग्रेसच्या काळात राज्यसभा सदस्यपद मिळाले, म्हणून काय त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला..? असे म्हटले का कुणी..? माझ्या नियुक्तीच्या वेळी सुब्रमण्यम् स्वामी हे एकमेव भाजपचे आहेत. संभाजीराजे भोसले, पत्रकार स्वपनदास गुप्ता यांच्यासह सात जणांची नियुक्ती झाली. त्यापैकी बहुतांश जण अपक्ष म्हणूनच सभागृहात बसतात. राष्ट्रपती काही निकषांवर नियुक्ती करतात. आपण खासदार असून भविष्यात कधीही भाजपमध्ये किंवा कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी दिलेले मंत्रिपददेखील स्वीकारणार नसल्याचे त्यांनी डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. कधीही कुणाचाही मिंधा नव्हतो, आत्ताही नाही अन् भविष्यातदेखील राहणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. {शब्दांकन : शेखर मगर
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अॅट्रॉसिटी अॅक्ट रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात डॉ. जाधव म्हणाले, इंडियन पिनल कोडच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण २२ टक्के आहे. काही राज्यांमध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र ते ३. टक्के एवढेच आहे. कमी प्रमाण असण्याचे कारण आपण लक्षात घेतले पाहिजे. अॅट्रॉसिटी अॅक्टचा दुरुपयोग केला जातो, असे म्हणणाऱ्यांना सांगावे की, ज्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाणच कमी आहे तिथे दुरुपयोग कसा होऊ शकतो? अॅट्रॉसिटी अॅक्टच्या एक तर तक्रारीच पोलिस ठाण्यापर्यंत येत नाहीत, आल्या तर गुन्हे नोंदवले जात नाहीत, नोंदवले तर पुढे ते न्यायालयात जात नाहीत, न्यायालयात गेले तर सरकारपक्ष व्यवस्थित लढत नाही. त्यामुळे शिक्षाही केली जात नाही. अशा गर्तेत सध्या हा कायदा अडकला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून होत असलेली मागणी अत्यंत चुकीची आहे. दुरुपयोग टाळण्यासाठी आणि कायदा आणखी कठोर करण्यासाठी त्यामध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींची जात शोधून त्यांच्याविरोधात पीडित जातीच्या लोकांनीच आंदोलन करण्याची पद्धत चुकीची आणि अत्यंत अश्लाघ्य आहे. नृशंस हत्याकांडातील गुन्हेगारांना जात नसते. त्यांना जातीय रंग देणे सर्वार्थाने चुकीचे आहे.
राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचे प्रमाण कमी
मराठा समाजात धनदांडगे आणि गरीब शेतकरी असे दोन वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मराठाबहुल राज्य सरकारे होती. त्यातून धनदांडगे आणि गरीब शेतकरी वर्ग निर्माण झाला आहे. धनदांडग्यांनी कधीही गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले नाहीत.
जागतिकीकरणाच्या लाटेत आपण सेवा आणि उद्योग क्षेत्राकडे लक्ष दिले, पण शेतीकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे शेती व्यवसाय अवसायनात निघाला आहे. आज शेतीवर अवलंबून असणारी कुटुंबे वाढत असून शेतीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे मराठा समाज जो बहुसंख्येने शेतकरी आहे त्यांच्यासमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम येथील सत्ताधारी मराठा समाजाने कधीही केले नाही. १९५१ पर्यंत राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा ५२ टक्के होता. कालांतराने हा देश उद्योगप्रधान, नोकरीप्रधान झाला. राष्ट्रीय उत्पन्नात उद्योगांचा वाटा २६ टक्के असून सेवा क्षेत्राचा ६० टक्के आहे. शेती पूर्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. त्या वेळी पर्जन्यदेखील आपल्याला साथ देत होते. आता सलग दुष्काळाची वर्षे आलेली आहेत, त्यामुळे आपल्याला सिंचनाशिवाय पर्याय राहिला नाही. सिंचनाच्यादेखील मर्यादा असल्यामुळे शेतीवर संकट आहे. सिंचनाचे देशातील प्रमाण ३६ टक्के एवढे असून महाराष्ट्रातील प्रमाण फक्त १७ टक्केच आहे. मराठवाड्यात तर त्यापेक्षाही कमी आहे.
ते म्हणाले, अनुसूचित जाती-जमाती यांच्या आरक्षणाला आर्थिक आधार अजिबात नसावा. त्यांचे आरक्षण मागासलेपणाच्या अाधारावरच पाहिजे. कारण अजूनही मागास प्रवर्गातील प्रत्येक घटकाला आरक्षणाचा लाभ झालेलाच नाही. जागतिकीकरणानंतर जाती व्यवस्था गळून पडण्याऐवजी त्या अधिक तीव्र होत आहेत. आश्चर्य म्हणजे प्रत्येक प्रबळ आणि जमीनदार जात स्वत:ला मागास संबोधून आरक्षणाची मागणी करत आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चानेच ही मागणी केली असे नव्हे, तर राजस्थानचे गुज्जर, गुजरातच्या पाटीदार समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. त्यांच्या जाती मागास नसल्यामुळे त्यांना आरक्षण देण्यास तांत्रिक अडचण आहे. बाबासाहेबांनी संविधानात सामाजिकदृष्ट्या मागास जातींना आरक्षणाची तरतूद केली आहे. तरीही सवर्णांना आरक्षण देण्याची गरज असेल तर आर्थिक निकषांवर आरक्षण देता येईल. मात्र, त्यासाठी राज्यघटनेत बदल करावा लागणार आहे. तो करण्यास काहीच हरकत नाही. क्रीमिलेअरची अट लावून आर्थिक मागासांना आरक्षण देण्यात यावे. पण त्यासाठी त्या-त्या परिस्थितीत बदलत राहणारी आर्थिक स्थिती लक्षात घेऊन क्रीमिलेअरची अट असावी. एससी, एसटी आणि ओबीसी यांना दिलेल्या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का लावता आरक्षण द्यावे. काही जण खूप टीका करतात, दलित समाज सरकारचे जावई आहेत का..? त्यांना सांगा की, मागील ४० वर्षांत आरक्षित समाजावर एकूण खर्च फक्त ३० हजार कोटी रुपये झालेला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी असून ६.५ टक्केसुद्धा नाही. मागास जातींसाठी अद्यापही लोकसंख्येच्या तुलनेत तरतूद केली जात नाही. तरतूद केलेली रक्कम दुसऱ्या विभागात फिरवली जाते. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मागास जातींचा ७२३ कोटी रुपयांचा निधी राष्ट्रकुल खेळांवर खर्च केला. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे दिली जाऊ शकतात.

हत्तीचे बळ घेऊन गेलो आहे
राज्यसभेत आल्यानंतर हमीद अन्सारी यांनी आपल्यावर एक महत्त्वाची टिप्पणी केल्याची आठवण डॉ. जाधव यांनी सांगितली. ‘उपराष्ट्रपती अन्सारी म्हणाले की, डॉ. जाधव, तुम्ही राज्यसभेत नुसता प्रवेश केला नाही, तर तुम्ही हत्तीचे बळ घेऊन आला आहात. तुम्ही आल्यामुळे राज्यसभेत चांगली चर्चा होईल.’
बातम्या आणखी आहेत...