आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तारतम्याच्या अभावाने सनसनाटी, नकारात्मकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बातमी मोठी करायची की छोटी याचे तारतम्य नाही. त्यातच स्पर्धेमुळे ‘लगावबत्ती’ बातम्या दिल्या जातात आणि त्यामुळे आपसूकच नकारात्मकता वाढते. पेपरमध्ये आऊट झालेली बातमी खरी, यावर 80 टक्के लोकांचा विश्वास असतो. समाजाचे खरे प्रतिबिंब दाखवणे हे वृत्तपत्रांचे काम आहे. त्यापासून त्यांनी दूर जाऊ नये. नकारात्मकतेचा परिणाम शेवटी देशाच्या प्रतिमेवरही होतो, असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

मराठी पत्रकार परिषदेच्या 39 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष माधवराव अंभोरे होते. व्यासपीठावर एस. एम. देशमुख, स्वागताध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, संजय वरकड, प्रमोद माने, अ‍ॅड. असीम सरोदे यांची उपस्थिती होती.

गेल्या 20 वर्षांत राज्य शासनाने पत्रकारांची एकही समस्या सोडवली नसल्याचे एस.एम. देशमुख यांनी सांगितले. आपल्या समस्या सोडवण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकी दाखवण्याची गरज असल्याचे अंभोरे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले, तर ज्येष्ठ पत्रकार डॉ. अनिल फळे यांनी आभार मानले.

माध्यमांत शिरतेय अपप्रवृत्ती
माध्यमांना बेजबाबदार म्हणू नये. तेथे बहुतांश लोक प्रामाणिक आहेत. काही अपप्रवृत्ती मात्र शिरल्या आहेत. तो चौथा स्तंभ राहिला नसून, स्वतंत्र संरचना झाली आहे, असे ते म्हणाले.

तीन आरशांचे उदाहरण
साध्या आरशात प्रतिमा आहे तशी दिसते. बर्हिगोल आरशात मोठी, तर अंतर्गोल आरशात छोटी दिसते. माध्यमांनी स्वनियंत्रित राहून साध्या आरशाचे काम करावे, असे ते म्हणाले.