औरंगाबाद - ‘हा आवाज कुणाचा?’ अशी आरोळी ऐकताच दहा दिशांनी ‘शिवसेनेचा’ असा प्रतिसाद ऐकण्याची गेली २५ वर्षे औरंगाबादकरांना सवय आहे. त्यांना शनिवारी गरवारे स्टेडियमवर ‘हा आवाज...भाजपचा’ अशा चकित करणाऱ्या आरोळ्या ऐकण्यास मिळाल्या.
देशभक्तिपर गीतांवर नृत्याचा ठेका धरणारे युवक, युवती आणि महिलाही पाहण्यास मिळाल्या. अलोट गर्दी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार,
सोनिया गांधी, राहुल गांधींचीच सभा हे चित्रही आज बाजूला पडले. गरवारेच्या मैदानावर मोदी लाट उसळलेली सर्वांनी पाहिली आणि अनुभवलीही.
औरंगाबाद जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. १९८६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात सुरू झाला. त्यांच्या प्रत्येक सभेला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान खच्चून भरून जात होते. राजीव गांधी, सोनिया, राहुल यांच्या सभांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या गरवारेच्या सभेसाठी किती गर्दी होणार, मैदान भरेल का, यासोबतच गेल्या महिन्यातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मोदींची लाट ओसरली का, असाही प्रश्न विचारला जात होता. त्याचे उत्तर आजच्या गर्दीने दिले. गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होते का, हे निकालानंतरच कळेल. मात्र, शिवसेनेच्या प्रचंड प्रभावाखाली असलेल्या शहर आणि जिल्ह्याला धक्का देण्याचे काम आजच्या सभेने केले आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार दीड लाख लोक मोदींना ऐकण्यासाठी आले होते. भाजपने दोन लाखांचा दावा केला आहे, तर शिवसेनेचे शहरप्रमुख राजू वैद्य यांनी गर्दी चांगली होती असे म्हटले आहे.
सभेनंतरचा संयम
शिवसेनाप्रमुखांच्या सभा संपल्या की घरी परतणारे तरुण सळसळत. आक्रमक घोषणा देत. मोदींच्या सभेनंतर बाहेर पडणारी गर्दी संयमित, विचारांमध्ये मग्न होती. पंतप्रधानांनी
आपल्यावर सफाईची, औरंगाबादच्या विकासाची जबाबदारी सोपवली आहे, अशी अनेकांची भावना होती. त्यापैकी काहींनी मोदींच्या आवाहनानुसार मैदानावर पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कागद उचलले. शिवसेनेच्या सभा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतून वाचण्यावरच समाधान मानणारे अनेक उद्योजक, बिल्डर, व्यापारी मोदींच्या सभेला होते. उच्च मध्यमवर्गीय महिला, शिक्षित तरुणांची संख्याही लक्षणीय होती.