आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi In Aurangabad On 20 August For Highway Openi

पंतप्रधानांच्या हस्ते औरंगाबाद -धुळे महामार्गाचे उद्घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 ऑगस्टनंतर होणार आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या महामार्गासह आणखी तीन महामार्गांचे भूमिपूजन केले जाणार असून प्राधिकरणाचे अधिकारी कामाला लागले आहेत. औरंगाबादेत होणा-या या कार्यक्रमात या महामार्गालगतच रेल्वेमार्ग टाकण्याची घोषणा पंतप्रधान करतील, अशी शक्यता आहे.

प्रस्तावित रस्त्यालगत रेल्वेमार्गासाठी जागा शिल्लक असून याबाबत विचारणा झाल्याने या मार्गाच्या कामाची घोषणा होऊ शकते, असे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. निवडणूक प्रचाराचा शुभारंभ औरंगाबादेतून होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान श्रीलंकेच्या दौ-यावर जात आहे. तेथून परतल्यानंतर 20 ऑगस्टनंतर डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कार्यक्रमासाठी ते शहरात येतील. या कार्यक्रमादरम्यान औरंगाबाद - धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे उद्घाटन होईल. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग 222 शी जोडणा-या गढी-माजलगाव, गढी-अहमदनगर, तर पुणे- नाशिक या 50 क्रमांकाच्या महामार्गाचाही भूमिपूजन सोहळा होईल. नितीन गडकरी यांनी राज्यातील प्रलंबित कामांची यादी मागवत तातडीने कामे सुरू करण्याचे आदेश दिले होते.

रेल्वेमार्गाची घोषणा शक्य
महामार्गासाठी 80 टक्क्यांवर भूसंपादन झाल्याने या कामाचा शुभारंभ होत आहे. सहापदरी रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 60 मीटर जागा संपादित केली आहे. रस्त्यासाठी 35 मीटर जागा लागत असून उर्वरित 25 मीटर जागा शिल्लक आहे. या रस्त्यालगतच रेल्वेलाइन टाकण्यासाठी विचार केला जात आहे.

सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद
या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी 14 लाखांची तरतूद केली असून त्यापैकी एक लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गात कन्नडजवळील औट्रम घाटात बोगदा तयार केला जात आहे. पटरी आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा टाकण्याचा निर्णय झाला.

रेल्वेमार्गामुळे फायदा काय ?
मनमाडचे जंक्शन औरंगाबादेत होईल
सेंट्रलच्या सर्व रेल्वेगाड्या औरंगाबादहून जातील
दिल्ली, सुरत, नागपूर, चेन्नईसारख्या मोठ्या शहरांशी जोडले जाणार
प्रस्तावित धुळे- इंदूर रेल्वेमार्गाचा प्रश्न निकाली निघेल
दौलताबाद डेपोचा माल चाळीसगावमार्गे गुजरात आणि उत्तर भारतात पाठवणे सोपे होईल

बैठकीत मुद्दा मांडू
- 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत मंत्र्यांसोबत होणा-या बैठकीत विकासात्मक मुद्दा आम्ही प्रामुख्याने उपस्थित करू. आशिष गर्दे, उपाध्यक्ष, सीएमआयए
- राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय आमच्याच नेत्यांकडे असल्याने महामार्गाबरोबर हाही विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. या प्रकल्पाची घोषणा झाल्यास देशातील कमी खर्चात होणारा रेल्वेमार्ग राहील. रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री