आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Divya Marathi, BJP, Aurangabad

जेथे अटीतटीच्या लढती तेथे मोदी!,महाराष्ट्रात आणखी चार सभा घेण्याचे नियोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आतापर्यंत 11 सभा झाल्या आहेत. आगामी काळातही चार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात भाजपला कडवी टक्कर मिळत असलेल्या लोकसभा मतदारसंघांत नरेंद्र मोदींच्या सभा ठेवण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोदी शनिवारी (12 एप्रिल) चिकलठाणा विमानतळावरून नगर व पुणे येथील जाहीर सभांसाठी रवाना झाले.


नरेंद्र मोदी दुपारी 4 वाजता राजस्थान येथून तीन सभा आटोपून विमानतळावर हजर झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, खासदार रावसाहेब दानवे, प्रदेश चिटणीस अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, नगरसेवक अनिल मकरिये, संजय केणेकर यांनी त्यांचे स्वागत केले. मोदी दुपारी 4.20 वाजता प्रदेशाध्यक्ष फडणविसांसमवेत प्रचार सभेसाठी नगर व पुणे शहरांकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले.


पुणे येथे भाजपचे अनिल शिरोळे यांची लढत काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्याशी आहे. कदम हे राज्याचे वन व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. शेवटच्या टप्प्यातील मतदानाला दोन दिवसांपूर्वी सभेचे नियोजन केले जात आहे. नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांच्याशी खासदार दिलीप गांधी यांची लढत आहे. नगरमध्ये यापूर्वी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची सभा झाली आहे. गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा राजळे यांनी बंडखोरी केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तुकाराम गडाखही बसपचे उमेदवार होते. तेव्हा पवार यांनी कर्डिलेंसाठी तीन ते चार सभा घेतल्या होत्या. यंदा कर्डिले भाजपचे आमदार आहेत.


जालन्यातही होणार सभा
24 एप्रिल रोजी मतदान असल्याने नरेंद्र मोदी यांच्या सभा उशिरा ठेवण्यात आल्या आहेत. जालना येथे 18 ते 20 एप्रिलदरम्यान मोदींच्या सभेचे नियोजन केले जात असल्याचे शिरीष बोराळकर म्हणाले. शहरातील मुकुंदवाडी येथे थ्रीडी होलोग्राम सभा 14 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.