आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका कर्मचाऱ्यांना साडेतेरा हजार रुपये बाेनस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीचा सण तोंडावर आला असताना महापालिका कर्मचाऱ्यांना १३ हजार ५०१ रुपयांचे सानुग्रह अनुदान (बोनस) अखेर जाहीर करण्यात आले असून, महापौर अशोक मुर्तडक यांनी आर्थिक खडखडाट असताना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनाचे कारण देत ३९० रुपयांची बक्षीसरूपात वाढ केल्याचेही स्पष्ट केले.

एकीकडे प्रशासनाकडून आर्थिक खडखडाटाचे कारण देत अनुदान कपातीसाठी हालचाली असताना, कर्मचाऱ्यांचा रोष परवडण्याजोगा नसल्यामुळे प्रतिष्ठेचा मुद्दा करीत सत्ताधाऱ्यांना वाढीसाठी संघर्ष करावा लागल्याचे दिसून आले. पालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वेळी १३ हजार रुपये सानुग्रह अनुदानाच्या रूपात देण्यात आले होते. यंदा शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी संघटना, वाहनचालक संघटना, शिक्षक संघटनांनी १५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती. मात्र, आर्थिक खडखडाटामुळे पाच हजारांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याच्या हालचाली होत्या. विशेष म्हणजे, सानुग्रह अनुदानाबाबत महासभेचा ठराव प्रशासनाला मिळालेला नव्हता. अशातच महापौर, आयुक्त अमेरिका दौऱ्यावर गेल्यामुळे घोंगडे भिजत पडले होते. सोमवारी म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सहाणे यांच्या नेतृत्वाखाली महापौरांची कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. त्यानुसार, मंगळवारच्या बैठकीत बोनसवर शिक्कामोर्तब करीत त्याचा लाभ येत्या दोन दिवसांत घ्यावा, अशाही सूचना केल्या. उपमहापौर, स्थायी सभापती, महिला बालकल्याण सभापती वत्सला खैरे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सभागृहनेते सलीम शेख, गटनेते अनिल मटाले, अजय बोरस्ते, शिवाजी सहाणे, राहुल ढिकले उपस्थित होते.

महापौरांनी केला प्रतिष्ठेचा मुद्दा : आर्थिकखडखडाटामुळे सानुग्रह अनुदान ११ हजारांपर्यंत करण्याचा मतप्रवाह पुढे आला, मात्र महापौरांनी तीव्र विरोध करीत माझ्या कार्यकाळात गेल्या वेळेपेक्षा एक रुपया तरी जास्त अनुदान देईल, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन केल्याचे कारण देत ३९० रुपयांची विशेष वाढ देत १३,५०१ रुपयांवर शिक्कामोर्तब झाले.

यांना मिळेल लाभ : स्थायीपदावरील सर्व अधिकारी,कर्मचारी, फिक्स पेवरील कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, रोजंदारी कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानद वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी मुख्यसेविक -सेविका, मदतनीस, अंशकालीन शिक्षिका, शिक्षण मंडळ कर्मचारी-सुरक्षारक्षक, खतप्रकल्प कर्मचारी, सर्व शिक्षा अभियान मानधन कर्मचारी, मनपा क्षयरोग सोसायटी कर्मचारी, आरसीएच प्रकल्प कर्मचारी, बुस्टर पंपिंग स्टेशन कर्मचारी.
बातम्या आणखी आहेत...