आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लेखाेरांच्या भीतीने नाशिक जिल्ह्यात एसटी बससेवा बंदच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तळेगाव-अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे पाचवर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराचे नाशिक जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांपासून हिंसक पडसाद उमटत असून त्याचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला अाहे. संतप्त जमावाने अाठ बसेसची जाळपाेळ केली व १८ बसेसची ताेडफाेड केली. त्यामुळे एसटी महामंडळाचे तब्बल दाेन काेटी रुपयांचे नुकसान झाले. परिणामी साेमवारी संपूर्ण जिल्ह्यात एसटी बसची वाहतूक बंदच ठेवण्यात अाली हाेती. त्यामुळे एेन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची मात्र गैरसाेय झाली.

बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलकांनी रविवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले हाेते. विल्होळी, वाडीवऱ्हे, गोंदे फाटा, पाडळी फाटा, गिरणारे रोड यासह नाशिक शहरातही अांदाेलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी खासगी वाहनांसह बसेसची तोडफोड, जाळपोळ केली. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून रविवारी दुपारपासूनच एसटी प्रशासनाने जिल्ह्यातील बससेवा थांबवली हाेती. सोमवारीही (दि. १०) जिल्हाभरातील १३ अागारांसह शहरी बससेवा पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला. या जाळपाेळप्रकरणी अज्ञात अाराेपींविराेधात पाेलिस ठाण्यात ‘एसटी’ने तक्रार दाखल केली असून पोलिस प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत बससेवा सुरू करणार नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी मध्यरात्री जेलरोड परिसरात काही समाजकंटकानी चारचाकी वाहन जाळले, तर नवले चाळ येथे एका वाहनाच्या काचा फाेडल्या. तर तणावामुळे साेमवारी सर्वच शाळांना सुटी देण्यात अाली हाेती.
अाराेपीवर पंधरा दिवसांत अाराेपपत्र; पीडितेला मदत
तळेगाव प्रकरणाबाबत सरकार अत्यंत गंभीर असून येत्या १५ दिवसात गुन्हेगारावर अाराेपपत्र दाखल करणार असून तपासात कुठेही कसूर केली जाणार नाही, अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पीडित कुटुंबियांची अापण भेट घेतली असून त्यांचे म्हणणेही एेकून घेतले अाहे. त्यांच्याबद्दल सर्वांनाच सहानुभूती अाहे. अाता शांतता प्रस्थापित करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, पीडित मुलीला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची मदत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
गुन्हेगारांचे हातपाय तोडा, पण दलितांवर हल्ले नकाे : अाठवले
अमरावती - ‘अत्याचाराच्या घटनेतील गुन्हेगारांचे हात पाय तोडा, मात्र दलित वस्त्यांवर हल्ले करु नका,’ असे अावाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले. नाशिक येथील घटनेचा निषेध करीत राज्यात दलित विरुद्ध सवर्ण असा संघर्ष निर्माण होत असल्याबद्दल अाठवले यांनी चिंता व्यक्त केली. कोपर्डी येथील घटनेला जबाबदार असलेले गुन्हेगार अामच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र त्यानंतरही राज्यात काही ठिकाणी अशा घटना घडताना दिसत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनांतील दोषींना कठोर शासन होणे गरजेचे आहे; मात्र घटनेनंतर संपूर्ण समाजाला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. कोपर्डी घटनेनंतर नगर जिल्ह्यात दलित विरुद्ध सवर्ण वाद नाही. मात्र नाशिकच्या घटनेनंतर राज्याची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होणे चांगली बाब नाही, असे मतही अाठवले यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...