आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूलबसचालकांना आरटीओचा ब्रेक; 38 चालकांवर गुन्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गेल्या दोन दिवसांपासून सकाळी स्कूल बसेसची प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) तपासणी सुरू केली आहे. यामध्ये विविध इंग्रजी व मराठी माध्यमांच्या 38 स्कूलबसेसच्या चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. अमरावती आरटीओच्या अधिकार्‍यांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा धसका घेऊन नाशिकच्या आरटीओ अधिकार्‍यांनी ही कारवाई सुरू केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या खासगी व संस्थांच्या बसेसबाबत शासनाच्या गृह आणि प्रादेशिक परिवहन विभागाने अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेद्वारे स्कूलबस चालकांना 23 नियमांची सक्ती करण्यात आली आहे. सदर नियमांची अंमलबजावणी न करणार्‍या स्कूलबसेसची नियमित तपासणी करून त्यांच्यावर कारवाईचे परिवहन विभागास प्रशासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात अमरावतीत चार अधिकार्‍यांना स्कूलबसेसची नियमित तपासणी न केल्यामुळेच विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईचा राज्यभरातच परिवहन विभागाने धसका घेत ठिकठिकाणी कारवाई सुरू केल्याचे दिसून येत आहे. या अंतर्गत परिवहन अधिकारी चंद्रकांत खरटमल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष पेडामकर, सहायक अधिकारी विजय काठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून शहरात स्कूलबसेसची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या भागात तपासणी
गंगापूररोड, आनंदवल्ली, एसटी कॉलनी, कॉलेजरोड, महात्मानगर, जेहान सर्कल, एबीबी सर्कल परिसरात विद्यार्थी वाहतूक बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये 38 बसचालकांना नोटिसा देऊन कारवाई करण्यात आली. या बसचालकांना किमान दोन हजारापासून ते दहा हजारापर्यंत दंड होऊ शकतो. यात, बहुतांशी बसचालकांनी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे बसमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविलेली नसून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याचे आढळून आले आहे.

अशी आहे नियमावली
> स्कूलबसचालकांना विद्यार्थी वाहतुकीचा स्वतंत्र परवाना सक्तीचा
> बसवर पिवळा रंग आणि त्यावर तपकिरी रंगाचा पट्टा.
> बसच्या मागे आणि पुढे विद्यार्थ्याचे चित्र, अग्निरोधक यंत्र, विद्यार्थ्यांना धरण्यासाठी हॅँडल.
> बसमध्ये स्पीड गव्हर्नर, दप्तर ठेवण्यासाठी जागा यासारख्या नियमांची सक्ती करण्यात आली.