आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे पाणी वैजापूरला मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तीव्र पाणीटंचाईच्या संकटात होरपळणाऱ्या नागरिकांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्यात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी संबंधित विभागाल दिले. परंतु, स्थानिक पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी न झाल्याने नांमकात पाणी सोडण्यास नाशिक पाटबंधारे विभागाने स्पष्ट नकार दर्शवला आहे.

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. दरम्यान, सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांमका पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या असून रविवारी सकाळी पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी आमदार आर. एम. वाणी यांनी नाशिक जिल्ह्यात दमदार पावसामुळे दारणा धरण समूहातून नांदूर मधमेश्वर कालव्यात ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली होती. तालुकाप्रमुख प्रा. रमेश पा. बोरनारे, माजी सभापती बाबासाहेब जगताप आदींसह पदाधिकाऱ्यांनी याबाबत शिवतारे यांची भेट घेऊन सद्य:स्थितीत दारणा समूहातील धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईने ग्रासलेले असून जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यातच पुढील पंधरवड्यात तालुक्यातील लाडगाव येथे असलेल्या धार्मिक कार्यक्रम तसेच नांमकाच्या लाभक्षेत्रातील सुमारे १०० गावांतील पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती देत कालव्यात पाणी सोडण्याची विनंती केली होती. दरम्यान, या मागणीचा तत्काळ विचार करत शिवतारे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाला तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाशिक पाटबंधारे विभागाने हालचाली सुरू केल्या होत्या. नाशिक पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यास टाळाटाळ चालवली आहे. दरम्यान, राज्यमंत्री शिवतारे यांच्या आदेशानुसार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाकडे पाण्याबाबत चौकशी केली असता अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. सेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमकतेनंतर स्थानिक पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या. यासंदर्भात नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाने शनिवारी दुपारी नांमकात ४० दिवस पाणी सोडण्याची मागणी दूरसंदेश यंत्रणेमार्फत नोंदवली. रविवारी ७०० क्युसेक वेगाने पाणी कालव्यात सोडण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नाशिक पाटबंधारे विभागाकडे मागणी नोंदवली गेल्याने रविवारी सकाळी पाणी सोडण्याची शक्यता आहे.

पाटबंधारे विभागाची टाळाटाळ
दरम्यान, सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, बाबासाहेब जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नांमका पाटबंधारे विभाग गाठले. नांमकात पाणी सोडण्याबाबत त्यांनी विचारणा केली असता सध्या ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी त्यात गुंतले असल्याचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांनी सांगितले. अपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेमुळे नांमकाला पाण्याची मागणी केली नव्हती. पाण्याचे आवर्तन सुटल्यावर त्याचे नियोजन कसे करणार, असा उलट सवाल अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना केला. त्यावर सेना स्टाइलने आंदोलनाचा इशारा देत पदाधिकारी आक्रमक झाल्यावर मात्र अधिकारी नरमले व त्यांनी पाण्याची मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...