आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasik Refusing To Releasing Water For Jayakwadi Dam

जायकवाडीला पाणी सोडण्‍यासाठी नाशिकच्या अधिकार्‍यांनी दाखविला ठेंगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नांदूर-मधमेश्वरमधून एक्स्प्रेस कालव्यातून गंगापूर आणि वैजापूर तालुक्याला पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला नाशिकच्या जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठेंगा दाखवला. याची गंभीर दखल घेतानाच या प्रकल्पातून कालव्यात पाणी सोडण्याआधी मराठवाड्याकडे विचारणा करावी आणि 0.8 टीएमसी पाणी सोडण्यात यावे, असे आदेश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
मुख्य अभियंता मुंबईत आहेत. अधीक्षक अभियंता पाणीवाटप कामानिमित्त कोपरगावला गेले आहेत, अशी सबब पुढे करण्यात आली. नाशिक कडाचे एक कार्यकारी अभियंता आले होते. पाण्याचा साठा किती, नांमकात किती पाणी सोडले, याची माहिती विचारताच त्यांनी कानावर हात ठेवले.

विभागीय आयुक्तांनी नाशिकच्या अधिकार्‍यांना लेखी पत्र दिले होते. त्याचबरोबर मोबाइलवरही संपर्क साधला होता. तरीही अधिकार्‍यांनी दांडी मारल्याच्या प्रकाराची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. शासन तसेच मुंबई उच्च न्यायालयाला बैठकीचे इतिवृत्त कळवण्यात येणार असून, त्यात हा उल्लेख करण्यात येणार असल्याचे उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

राजकीय दबाव?
पाणी सोडण्याचे आदेश देण्यापूर्वी म्हणणे ऐकून घेण्यासाठी नाशिकच्या अधिकार्‍यांना बोलावण्यात आले होते. मात्र, राजकीय दबावामुळे अधिकार्‍यांनी कारणे पुढे केल्याचे बोलले जाते. वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिल्यास महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, तसे होऊ नये म्हणून नाशिक आणि नगर जिल्ह्यातील नेत्यांनी अधिकार्‍यांवर दबाव आणल्याचे सांगण्यात आले.

‘नांमका’च्या पाण्यावर आरक्षण टाका
औरंगाबादच्या जिल्हाधिकार्‍यांनी नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातील पाण्यावर कायमस्वरुपी आरक्षण टाकावे, असे सूचित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घेऊन शासनाला कळवावे, अशी सूचना करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आरक्षणाची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

‘नांमका’तील दोन्ही कालव्यातून पाणी सुरू
वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला पाणी देणारा एक्स्प्रेस कालवा सोडून नांमकातील उजव्या आणि डाव्या अशा दोन्हीही कालव्यातून पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बैठकीला उपस्थित नाशिकच्या अधिकार्‍यांनी याबाबत कानावर हात ठेवले.

जोरदार पाऊस हाच चांगला पर्याय
भरलेल्या धरणातून पाणी सोडण्यास नाशिककर राजी नाहीत. दुसरीकडे नगरकरांचीही हीच भावना आहे. त्यामुळे जायकवाडीत पाणी कसे येणार असा प्रश्न आहे. प्रशासकीय पातळीवर त्यांच्या परीने प्रयत्न करण्यात येत असले तरी येथील राजकीय दबाव गट किंवा थेट न्यायालयामार्फतच पाणी मिळू शकते, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अर्थात जोरदार पाऊस हा सर्वात चांगला पर्याय जायकवाडी भरण्यासाठी आहे.

मेंढेगिरी समितीचा अहवाल आज
औरंगाबाद । समन्यायी पाणीवाटपावर वाल्मीचे महासंचालक हिरालाल मेंढेगिरी समितीचा अहवाल मंगळवारी सादर होणार आहे. जलसंपदा विभागाच्या मुंबईतील बैठकीत तो मांडला जाईल. या दीडशे पानी अहवालावरून पाणीवाटपाची भूमिका ठरणार आहे. उच्च् न्यायालयाच्या आदेशानंतर मेंढेगिरी समिती नेमण्यात आली होती. 29 जानेवारी रोजी त्यावर आदेश काढण्यात आला. समितीत औरंगाबाद व नाशिकचे अधिकारी सदस्य आहेत.