आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैठण - प्रशासनाने आडमुठे धोरण राबवल्याने गेल्या वर्षी काल्याची दहीहंडी प्रशासनाने फोडून नाथ परंपरेला गालबोट लावण्याचा प्रकार केला होता. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ते घडले. मात्र, यंदा काल्याची दहीहंडी आम्हीच फोडणार असल्याचे नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी सांगितले.
‘दिव्य मराठी’ने नाथषष्ठीच्या पार्श्वभूमीवर नाथवंशजांच्या वादासंदर्भात संवाद साधला होता. या वेळी रावसाहेब महाराज गोसावी म्हणाले, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. त्या वेळी प्रशासनाने नाथवंशजांसाठी नाथ समाधी मंदिरात जाण्यासाठी पास दिले. त्यांची काहीच गरज नव्हती. यंदाही प्रशासन आडमुठे धोरण अवलंबत असले तरी लाखो वारकरी, भक्तांसाठी आम्ही काल्याची दहीहंडी फोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी पुष्कार महाराज गोसावी यांची उपस्थिती होती. या वेळी रावसाहेब महाराज गोसावी यांनी वंशवाद हा आमचा विषय नसल्याचे सांगितले. यंदा नाथवंशज दहीहंडी फोडणार काय, याची चर्चा पैठणसह राज्यभरातील वारकरी, नाथभक्तांमध्ये सुरू होती. मात्र, नाथवंशज रावसाहेब महाराज यांनी आम्हीच दहीहंडी फोडणार हे सांगितल्याने तूर्त तरी या विषयावर पडदा टाकला असल्याचे दिसते.
प्रशासनाने का फोडली दहीहंडी?
परंपरेनुसार नाथवंशज हे काल्याची दहीहंडी फोडतात. गेल्या वर्षी मात्र रघुनाथबुवा पांडव पालखीवाले यांना न्यायालयाने दत्तकपुत्र मान्य केल्यानंतर त्यांची पालखी समाधी मंदिरात आली. ही पालखी व रघुनाथबुवा समाधी मंदिराच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत आम्ही मंदिरात येणार नाही, अशी भूमिका नाथवंशज रावसाहेब महाराज यांनी घेतल्याने शेवटी दहीहंडी फोडण्यास प्रशासनाने पुढाकार घेतला होता.
नाथषष्ठीसाठी कडक बंदोबस्त
महाराष्ट्रातील पंढरपूरनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून नाथषष्ठीकडे पाहिले जाते. राज्यभरासह अन्य ठिकाणाहूनही नाथषष्ठीच्या तीनदिवसीय सोहळ्यासाठी सुमारे 10 लाख वारकरी संत एकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी पैठणमध्ये येतात. नाथवंशज यांचा वाद लक्षात घेता यंदाच्या नाथषष्ठीसाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक सी. पी. काकडे यांनी सांगितले.
शहरातील नाथमंदिर परिसरात तीन पोलिस चौक्या उभारल्या आहेत. तसेच 20 पोलिस अधिकारी 200 पोलिस कर्मचारी, 250 होमगार्ड तैनात राहणार आहेत. तसेच यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.
उत्सवात सहभागी झाले पाहिजे
रावसाहेब महाराज गोसावी यांना मी दोन वेळेस बोलावले होते. मात्र, ते आले नाहीत. आम्ही रांजणाची विधिवत पूजा केली. कोर्टाने आम्हाला दत्तकपुत्र मान्य केले असून त्यांनी कोर्टाचा मान ठेवून या उत्सवात सहभागी झाले पाहिजे. दोघे मिळून उत्सव साजरा करू, अशी भूमिका त्यांनी घ्यावी.- रघुनाथबुवा पांडव (पालखीवाले)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.