आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादच्या मल्टिप्लेक्समध्ये राष्ट्रगीताचे रिमिक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनामनात राष्ट्रप्रेमाची ज्योत चेतवण्यासाठी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत म्हटले जाते. 52 सेकंदांचे हे गीत प्रत्येकाच्या मनात देशाभिमानाचा संचार घडवून आणते. त्यामुळे शाळांबरोबरच मल्टिप्लेक्समध्येही राष्ट्रगीताची सुरुवात झाली. मात्र, आता त्याचे रिमिक्स स्वरूप वाजवले जात आहे. त्यामुळे एकसारखेपणा राहत नाही आणि राष्ट्रगीताचा अवमान होतो, असे अनेकांचे मत आहे, तर काहींना यात काहीही चूक वाटत नाही.

अशी झाली सुरुवात
शाळाशाळांमध्ये दररोज प्रार्थनेचा समारोप राष्ट्रगीताने करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शाळा-कॉलेज संपल्यावर राष्ट्रगीताचा फारसा संबंध येत नाही. ही बाब लक्षात घेऊन पुढे 26 जानेवारी 2003 रोजी राज्य शासनाने मल्टिप्लेक्समध्ये शो सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक केले. यास चांगला प्रतिसाद मिळाला. हळूहळू संपूर्ण देशाने महाराष्ट्राचा पॅटर्न राबवला. सिंगल स्क्रीन थिएटरसाठी राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक नाही, पण विशिष्ट प्रसंगी ते स्वत:हून ‘जन गण मन’ लावतात. 1980 मध्ये चित्रपट संपल्यावर राष्ट्रगीत वाजवले जात असे, पण नंतर ही पद्धत बंद पडली.

मल्टिप्लेक्समध्ये रिमिक्स
शाळा आणि महाविद्यालयामध्ये राष्ट्रगीताचे स्वरूपही बदलले आहे. तसेच मल्टिप्लेक्समध्ये रिमिक्स राष्ट्रगीत वाजवले जाऊ लागले. चमूने अंजली बिग सिनेमा, सत्यम सिनेप्लेक्स, ई-स्क्वेअर, फेम तापडिया, पीव्हीआर या पाच मल्टीप्लेक्सची पाहणी केली असता या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्रगीत वाजवले जात असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हा प्रकार नवीन पिढीच्या पसंतीला उतरत आहे. यात ए. आर. रहमान यांचे भारतबाला प्रॉडक्शनचे राष्ट्रगीत आघाडीवर आहे. मात्र, केवळ तरुणांना आवडते म्हणून राष्ट्रीय प्रतीकांची अशी अवहेलना होणे चुकीचे असल्याचे काही लोकांचे मत आहे. त्यासाठी ही मंडळी सातत्याने आवाज उठवते आहे.

रिमिक्सविरुद्ध लढा
मुंबईतील रूपारेल कॉलेजमधील देशभक्त मित्रांच्या जागरण या अनौपचारिक समूहाने शाळा, कॉलेज व मल्टिप्लेक्समध्ये पारंपरिक 52 सेकंदांचे राष्ट्रगीतच वाजवले जावे, यासाठी शासनाकडे आग्रह धरला आहे. त्यांनी शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून आपली मागणी रेटली. त्याची दखल घेत राजशिष्टाचारमंत्री सुरेश शेट्टी यांनी राज्यात एकसारखे राष्ट्रगीत वाजवले जाण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

कॉलरट्यूनवरही बंदी
याआधीही केंद्र सरकारने राष्ट्रगीताचा अवमान थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन म्हणजेच डॉटने नोव्हेंबर 2010 मध्ये राष्ट्रगीताच्या मोबाइल कॉलरट्यूनवर बंदी आणली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ओनर अँक्ट-1971 अन्वये ही बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्‍या ऑपरेटरचे लायसन्स रद्द करण्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.


राष्ट्रगीताविषयी केंद्राची नियमावली
केंद्र सरकारच्या गृह खात्याने राष्ट्रगीताबाबत एक नियमावलीच तयार केली आहे. यानुसार-
> 12 ओळींचे हे राष्ट्रगीत गाण्यासाठी 52 सेकंदांचा वेळ लागतो. या प्रकारातील राष्ट्रगीत शासकीय कार्यक्रमात, राष्ट्रीय सलामी देताना, राष्ट्रपती, राज्यपाल यांनी ध्वजसंचलनात सलामी देताना, शासकीय कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या आगमनाच्या वेळी, तर अन्य शासकीय समारंभाच्या समारोपावेळी, राष्ट्रपतींच्या आकाशवाणीवरील भाषणाच्या प्रारंभी आणि समारोपानंतर, संचलनात राष्ट्रीय ध्वज फडकवल्यावर तसेच शासनाच्या एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी केंद्र शासन विशेष आदेश काढून राष्ट्रगीत गाण्याची सूचना करू शकते.
> याशिवाय राष्ट्रगीताचा एक संकलित प्रकारही आहे. यात केवळ 4 ओळींचा समावेश असून ते गाण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ निश्चित केला आहे.
> शक्यतो पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत वाजवले जात नाही.
> राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी सूचना करणे आवश्यक आहे. यामुळे लोक सावधानच्या अवस्थेत उभे राहू शकतात. मात्र, एखाद्या माहितीपूर्ण कार्यक्रमात राष्ट्रगीत वाजवले असता उभे राहण्याची आवश्यकता नाही.
> युनेस्कोने ‘जन गण मन’ला जगातील सवरेत्कृष्ट राष्ट्रगीताचा बहुमान दिला आहे.
> स्वातंत्र्यापूर्वी कोलकात्यातील चित्रपटगृहे आणि सार्वजनिक कार्यक्रमात ब्रिटिशांचे राष्ट्रगीत वाजवले जात असे. भारतीयांनाही या वेळी उभे राहावे लागायचे. ‘गॉड सेव्ह दी क्वीन’ असे त्याचे बोल होते.


सगळीकडे वेगवेगळे राष्ट्रगीत


बिगमध्ये एक मिनिटाचे राष्ट्रगीत
आमच्याकडे कॉर्पोरेट ऑफिसमधून आलेले राष्ट्रगीतच वाजवले जाते. त्यात स्थानिक पातळीवर बदल करता येत नाही. पूर्वी लता मंगेशकर यांनी गायलेले गीत होते, नंतर ए. आर. रहमानचे इन्स्ट्रमेंटल आले. आता नवीन गीत आले आहे.
-नितीन सोनवणे, व्यवस्थापक, अंजली बिग सिनेमा


सत्यममध्ये 12 सेकंदांचे राष्ट्रगीत
पूर्वी आमच्याकडे 20 सेकंदांचे राष्ट्रगीत वाजवले जायचे. पण आता नवीन प्रोजेक्टर आल्यामुळे त्यात आधीपासूनच 12 सेकंदांचे ए. आर. रहमानचे इन्स्ट्रमेंटल राष्ट्रगीत फीड केलेले आहे. आम्ही लवकरच पुन्हा जुने राष्ट्रगीत लावणार आहोत.
-महेश भाटले, युनिट मॅनेजर, सत्यम सिनेप्लेक्स


ई-स्क्वेअरमध्ये 2 मिनिटांचे गीत
आम्ही इन्स्ट्रमेंटल राष्ट्रगीत वाजवतो. ते कोणी तयार केले याची माहिती नाही. बहुधा याचा कालावधी 2 मिनिटांचा आहे.
-सुधाकर साने, प्रभारी व्यवस्थापक, ई-स्क्वेअर


पीव्हीआरमध्ये सातत्याने बदल
आमच्या थिएटरमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो. कधी इन्स्ट्रुमेंटल, तर कधी रॉक बँडचे राष्ट्रगीत लावतो. ते नेहमीच बदलत असल्याने त्याचा कालावधी सांगता येणार नाही.
विकास खमट, व्यवस्थापक, पीव्हीआर


फेममध्ये एक मिनिटाचे राष्ट्रगीत
आमच्याकडे पूर्वी ए. आर. रहमानचे राष्ट्रगीत वाजवले जात होते; पण आता नवीन गीत आले आहे. बहुधा ही खंडेलवाल प्रॉडक्शनची निर्मिती आहे. त्याचा कालावधी एक मिनिटाचा आहे.
दशरथ खजिनदार, व्यवस्थापक, फेम तापडिया


विनाशकाले विपरीत बुद्धी
राष्ट्रगीताचा मान राखला जात नाही, हे अत्यंत दुर्दैव आहे. हा देशाचा अवमान आहे. राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान हा मोठा गुन्हा आहे, पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही. हा विनाशकाले विपरीत बुद्धीचा प्रकार आहे. शासनाने आता तरी शहाणे व्हावे आणि याबाबत लवकरात लवकर अत्यंत कडक कायदा करावा. एवढेच नव्हे तर चुकीचे किंवा रिमिक्सचे राष्ट्रगीत गाणार्‍यांवर सरळ खटले दाखल करावेत.
सुनील घनवट, समन्वयक, हिंदू जनजागरण समिती


रिमिक्सला विरोध कशासाठी?
राष्ट्रगीताचे रिमिक्स अवतार बंद करण्याबाबत शासन गंभीर असले तरी निदान यामुळे मुलांना ते पाठ होते. कसेही गायले तरी ते राष्ट्रगीतच राहणार आहे. त्यात दुसर्‍या देशाची स्तुती थोडीच होणार आहे?
भक्ती कुलकर्णी, संचालक, गोल्डन इव्हेंट्स


बाजारीकरण थांबवा
राष्ट्रगीतातून राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान निर्माण होतो. मात्र, आता कोणीही कशाही प्रकारे राष्ट्रगीत गात आहे. हे टाळण्यासाठी एकसमान राष्ट्रगीत वाजवणे सक्तीचे करायला हवे. सध्या सुरू असलेले त्याचे बाजारीकरण थांबवायलाच हवे.
एस. एल. देशमुख, ज्येष्ठ नागरिक


अध्यादेश काढणार
शाळा, कॉलेज आणि मल्टिप्लेक्समध्ये वाजवले जाणारे राष्ट्रगीत एकसारखे नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे. ही गंभीर बाब आहे. यामुळे विधिमंडळात सादर होणार्‍या राष्ट्रगीताच्या सीडी वितरित करणार आहोत. या राष्ट्रगीताचे सूर, धून, संगीत एकसमान राहील. तसेच ते 52 सेकंदांचेच असेल. राष्ट्रगीताचा एकजिनसीपणा कायम ठेवण्यासाठी अध्यादेश काढण्याची तयारी केली आहे. यासाठी शासन लवकरच एक जीआर काढणार आहे.
सुरेश शेट्टी, राजशिष्टाचारमंत्री