आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Conference In Jawaharlal Nehru College,

देशांतर्गत दहशतवाद गंभीर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी व्यक्त केली खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गरिबीची समस्या प्रत्येक देशात आहे. मात्र, देशांतर्गत नक्षलवाद, दहशतवाद ही आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या असल्याची खंत माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी व्यक्त केली. सोमवारी अजंता एज्युकेशन सोसायटी संचालित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय आणि यूजीसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "भारतासमोरील आव्हाने आणि सद्य:स्थिती' या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

गुजराथी म्हणाले की, दहशतवादाबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणीप्रश्न यादेखील समस्या आहेत. यावर मात करत महासत्ता होऊ पाहणा-या भारतापुढे शेजारी देशांकडून होणाऱ्या कारवायांचेही मोठे आव्हान आहे. सीमेवर रोज काहीतरी सुरू आहे. त्यामुळे एक सकारात्मक भूमिका घेऊन सर्वांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याची गरज आहे. केवळ कायदा करून हा दहशतवाद संपणार नाही. मानवतावाद कसा निर्माण करता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी रंगनाथ काळे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, डॉ. राकेशकुमार शर्मा, डॉ. विलास खंदारे, के. एस. अतकरे, उल्हास उढाण, प्राचार्य डॉ. शिवाजी अंभोरे, विलास काबरा यांची उपस्थिती होती.
वनमंत्र्यांनी जंगले संपवली : पाणी, शेतजमीन याबरोबरच पर्यावरणाच्या -हासाला जंगलांची कत्तल जबाबदार आहे. जोपर्यंत वनमंत्री नव्हते तोपर्यंत जंगले होती. मात्र, आता वनमंत्री आले अन् जंगलेच नाहीशी झाली. दारूबंदी खात्याचे मंत्री आले अन् व्यसनाधीनता वाढली असा राजकीय टोलाही गुजराथी यांनी लगावला.

जगण्यावर प्रेम करा
शेतक-यांच्या आत्महत्यांविषयी बोलताना गुजराथी यांनी शेतकऱ्यांना आदिवासींचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला. पोलिस म्हणतात, आदिवासी नक्षलवाद्यांना मदत करतात आणि नक्षलवादी म्हणतात, तुम्ही पोलिसांचे खबरे आहात. या दोन्ही बाजूंनी आदिवासींचा विकास खुंटला आहे. रोजच्या जगण्याच्या समस्या असतानाही त्यांनी कधी आत्महत्या केल्या नाहीत. तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्ज माफ करून चालणार नाही, तर त्यांना भांडवल उपलब्ध करून द्यावे लागेल.

नगर विरुद्ध औरंगाबाद
महाराष्ट्र-कर्नाटकनंतर नगर विरुद्ध औरंगाबाद अशी पाण्याची समस्या आहे. पुढचा संघर्ष हा याच पाण्यावर असणार आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शासन, प्रशासनाला जबाबदार ठरवण्यापेक्षा आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. कारण जगात भारताकडे ५ टक्के जमीन, ३ टक्के पाणी आणि १५ टक्के लोकसंख्या आहे. गरज आहे ती पळणा-या पाण्याला थांबवण्याची आणि थांबलेल्या पाण्याला जिरवण्याची. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.