आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश खनिजसंपन्न असतानाही आयातीवर अब्जावधींचा खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतात ८९ प्रकारच्या खाणी असून त्यातून मुबलक प्रमाणात खनिजसंपत्ती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. पण कडक कायदे आणि सामाजिक विरोधामुळे आपल्याला अद्यापही साधा कोळसादेखील आयात करावा लागतो आहे. त्यामुळे खाणींतून होणारी हानी टाळून नैसर्गिक हार्मोनी, सार्वजनिक आरोग्य आणि जैवविविधतेची पुनर्स्थापना करणे गरजेचे आहे, असा सल्ला झारखंड येथील (हजारीबाग) आचार्य विनोबा भावे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गुरुदीप सिंग यांनी दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभाग ‘नॅशनल एन्व्हायर्नमेंटॅलिस्ट्स असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरणाचे आरोग्य’ या विषयावर तीनदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते सोमवारी (२३ नोव्हेंबर) उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. व्यासपीठावर प्र. कुलगुरू डॉ. एम. पी. सिन्हा (हजारीबाग), विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर हिवरे, परिषदेचे आयोजक डॉ. दौलतराव सोनवणे, संयोजन सचिव प्रा. ई. आर. मार्टिन आदींची उपस्थिती होती. ‘हॉर्मनी विथ नेचर इन कॉन्टेक्स ऑफ बायोरिसोसेस अँड एन्व्हायर्नमेंटल’ या विषयावरील परिषदेत कुलगुरू डॉ. गुरुदीप सिंग यांचे बीजभाषण झाले. त्या वेळी ते म्हणाले, जैविक भौगोलिक विविधता हे भारताचे वैशिट्य आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण लोकसंख्येमुळे पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात आले आहे. देशात खनिजसंपत्तीचा मुबलक साठा असतानाही कडक पर्यावरण कायद्यामुळे कोट्यवधी रुपये खनिज आयातीसाठी मोजावे लागत आहेत. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने ‘स्टॉकहोम’ येथे घेण्यात आलेल्या पहिल्या पर्यावरण परिषदेपासून या विषयावर किमान चर्चा, विचारमंथन करण्यास सुरुवात झाली आहे. आजघडीला भारतातील पर्यावरणविषयक कायदे अत्यंत कडक असल्यामुळे दरवर्षी कोटी हजार लाख रुपये कोळशाच्या आयातीवर खर्च करावा लागत आहे. नांदेडचे कुलगुरू डॉ. विद्यासागर म्हणाले, हजारीबाग येथील प्र. कुलगुरू डॉ. एम. पी. सिन्हा यांनी नॅशनल एन्व्हायर्नमेंटॅलिस्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त ही परिषद होत असल्याने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी समाधान व्यक्त केले.

मनुष्य निसर्गाला बदलण्याचा प्रयत्न करतो : डॉ. हिवरे
निसर्गातील सर्व प्राणिमात्र निसर्गाप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवून आणतात. माणूस हा समाजशील असूनही निसर्गालाच बदलवण्याचे प्रयत्न करतो, ही चिंतेची बाब आहे, असे डॉ. चंद्रशेखर हिवरे म्हणाले. परिषदेत २९५ शोधनिबंध, १३४ पोस्टर्स सादर होणार असून १५ सत्रांत मंथन होणार आहे, असे डॉ. दौलत सोनवणे यांनी सांगितले. डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. मीना पाटील आदींची उपस्थिती होती. डॉ. स्मिता सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर सुनीता बोर्डे यांनी आभार मानले.