आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Rural Health Mission Fund Demand Aurangabad

जिल्ह्याच्या आरोग्यासाठी 42 कोटींचे अंदाजपत्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून 2014-15 या वर्षात ग्रामीण भागातील नागरिकांना विविध आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 42 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्याचबरोबर जानेवारी-जून 2014 या सहा महिन्यांत निर्माण होणार्‍या संभाव्य पाणीटंचाईसाठी 15 कोटी 55 लाख रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

2013-14 या वर्षात एनआरएचएम (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान) साठी 35 कोटींचे अंदाजपत्रक तयार करून आरोग्य संचालकांकडे मंजुरीसाठी पाठवले होते. त्याला मंजुरीही मिळाली होती. मात्र, आरोग्य विभागाकडून केवळ 20 कोटी 90 लाख रुपये खर्च करण्यात आले. चालू वर्षातील अंदाजपत्रकापेक्षा कमी रक्कम खर्च करूनही जास्तीच्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी वाढीव अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यातून रुग्णांना औषधोपचार, कर्मचार्‍यांचे वेतन, आशा कार्यकर्त्यांचे मानधन, विविध प्रकारचे लसीकरण, जननी सुरक्षा योजना, शालेय मुलांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार, कुपोषण निर्मूलनासाठी खर्च करण्यात येईल.

नवीन उपक्रम : जास्तीच्या अंदाजपत्रकात डिलिव्हरी पॉइंटवर सोलार दिवे लावणे, प्रत्येक गावात आशा कार्यकर्त्यांची संख्या वाढवणे, बालरोगतज्ज्ञांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील भेटी वाढवून मुलांची तपासणी करणे, आरोग्यसेविकांनी 10 पेक्षा जास्त महिलांची प्रसूती केल्यास त्यांना प्रोत्साहन भत्ता देणे याचा समावेश आहे.

पाण्यासाठी 15 कोटी रुपये
नवीन वर्षात जानेवारी ते जून 2014 या सहा महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाईसाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने 15 कोटी 55 लाख 99 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यात सर्वाधिक गंगापूर तालुक्यातील 313 गावे आहेत. त्यानंतर कन्नड 100 व पैठण 76 गावांचा समावेश आहे. सर्वात कमी खुलताबाद तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे. यात नवीन विंधन विहीर घेणे, विहीर अधिग्रहण करणे, नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्ती, विशेष विहीर दुरुस्ती आणि टँकर सुरू करणे प्रस्तावित आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर 2013 या कालावधीत वैजापूर मधील 20 आणि गंगापूरमधील 16 गावांच्या विहीर अधिग्रहणासाठी आतापर्यंत 1 कोटी 27 लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार त्यावर खर्च करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए. बी. गायकवाड यांनी दिली.