आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळे धन पांढरे करणे अशक्य, जन-धन योजनेच्या प्रत्येक खात्याची सहा महिन्यांनी तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जन-धन योजनेतील सर्व खात्यांतील व्यवहाराची सहा महिन्यांत तपासणी होणार आहे. त्यात संशयास्पद उलाढाल आढळल्यास कारवाई केली जाईल. शिवाय खातेदाराकडून निवास, आधार व रेशन कार्ड, लाइट बिल आदी कागदपत्रेही टप्प्याटप्प्याने घेतली जाणार असल्याने काळा पैसा गुंतवणे अशक्य असल्याचे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक क्षेत्रातील अस्पृश्यता संपवण्यासाठी मोदींनी पहिले पाऊल उचलले. दोन दिवसांपूर्वी त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ज्यांचे आतापर्यंत कुठल्याच बँकेत खाते नाही अशा सुमारे एक कोटी लोकांची खाती राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ३१ हजार लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. ही योजना गोरगरिबांच्या हिताची असली तरी त्याचा गैरवापर काही मंडळींकडून होऊ शकतो. काळा पैसा दडवण्यासाठी ही खाती वापरली जाऊ शकतात, असा सूर बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून लावण्यात आला होता. शिवाय या योजनेचे पुढील टप्पे काय असतील याविषयीही चर्चा सुरू झाली. त्यामुळे ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने या संदर्भात काही वरिष्ठ, अनुभवी तसेच योजनेच्या आखणीपासून काम केलेल्या बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

घरापासून जवळच्या बँकेत खाते : शहरात ४२ बँकांच्या ३८८ शाखांमधून जन-धन योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये खासगी बॅँकांचाही समावेश अाहे. फक्त नागरी बँकांना यातून वगळण्यात आले आहे. खाते उघडण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांना ते राहत असलेल्या भागानजीकच्या बँकेच्या शाखेत खाते उघडता येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र बँक, एसबीआय आदी एकत्रित प्रयत्न करत आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुलैअखेरीस सुरू झाले होते योजनेवर काम
या योजनेतील अनेक मुद्द्यांविषयी अर्थमंत्रालयाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे, असे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्याचे काम जुलै महिन्याच्या अखेरीस वेगात सुरू झाले होते. त्या दृष्टीने देशभरातून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्या वेळीही अशा प्रकारच्या खात्यांमधून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो का, या मुद्द्यावर चर्चा झाली होती.