आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress News In Marathi, Aurangabad Lok Sabha Seat, Satish Chavan

औरंगाबादसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न कमजोर,प्राधान्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जंग जंग पछाडले. मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादीने सातत्याने मागणी लावून धरली. काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याने शेवटच्या दोन दिवसांत राष्ट्रवादीच्या आशा उंचावलेल्या होत्या. परंतु अखेर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या पारड्यात जाताच पुन्हा राष्ट्रवादी बॅकफूटवर आली. राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व मतदारसंघ सोडवून घेण्यात कमी पडलेले असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीलाही पश्चिम महाराष्ट्राशिवाय इतरत्र फारसा रस नसल्याचे स्पष्ट झाले.


राज्यात काँग्रेस 26 व राष्ट्रवादी 22 लोकसभेच्या जागा लढवणार हे निश्चित सूत्र ठरलेले होते. हातकणंगले येथे राजू शेट्टींचा जोर लक्षात घेता उपरोक्त जागा काँग्रेसला सोडण्याचे चातुर्य पक्षाच्या नेतृत्वाने दाखवले. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जागा अदलाबदलीसाठी विभागाचे सूत्र जाहीर केले होते. मराठवाडा विभागातील जागा राष्ट्रवादीने सोडली तर मराठवाड्यातीलच दुसरी जागा त्याबदल्यात काँग्रेस मराठवाड्यातील देईल. असे असताना सोयीनुसार या सूत्रालाही मूठमाती देण्यात आली.


हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटेल यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते पाण्यात देव बुडवून बसले होते. राष्ट्रवादीतर्फे आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, विनोद पाटील, भाऊसाहेब चिकटगावकर यांनी कसोशीने प्रयत्न केले. परंतु रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी नेतृत्वाने औरंगाबादला तिलांजली दिली. औरंगाबाद लोकसभेसाठी आमदार सतीश चव्हाण इच्छुक होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक जिंकल्यानंतर आमदार चव्हाण यांचा आत्मविश्वास वाढला होता. निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या औरंगाबाद जिल्हय़ासह मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांना त्यांनी मंडळात व्यवस्थितपणे सामावून घेतले होते. पदवीधर मतदारसंघासह लोकसभा निवडणुकीचेही गणित यातून चव्हाण यांनी डोळ्यासमोर ठेवले होते. दोन वर्षांपासूनच त्यांनी औरंगाबादमधून राष्ट्रवादी लढणार म्हणून जाहीरपणे बोलण्यास प्रारंभही केला होता. परंतु र्शेष्ठींनी ऐनवेळी त्यांना हुलकावणी दिल्याने स्थानिक पदाधिकार्‍यांचा हिरमोड झाला.


पक्षाने गांभीर्याने घेतले होते
औरंगाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटावा यासाठी पक्षाने गांभीर्याने तयारी चालवली होती. आमदार सतीश चव्हाणांसारखा शक्तिशाली उमेदवार आमच्याकडे होता. पक्षाला जागा लढवण्यास र्मयादा आल्याने जागा ओढून घेण्यात अपयश आले. विनोद पाटील, शहर कार्याध्यक्ष


काँग्रेस तयार नव्हती
राष्ट्रवादीला जागा सोडण्यास काँग्रेसची मानसिकता नव्हती. काँग्रेसचे राजेंद्र दर्डा, आ. डॉ. कल्याण काळे तयार नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीला जागा सोडण्यात यावी, अशी भूमिका घेण्यात आली होती. सुधाकर सोनवणे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.


पवार, सोनियांचा निर्णय अंतिम
राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक वेळी निवडणुकीची तयारी ठेवूनच काम करते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संघटनात्मक काम आहे. हिंगोली मतदारसंघ राष्ट्रवादीने सोडल्यामुळे औरंगाबाद मिळावा यासाठी प्रयत्न केले; परंतु शरद पवार व सोनिया गांधींनी निर्णय घेतल्यामुळे त्याचे पालन करणार आहे. आमदार सतीश चव्हाण