आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वांनी केले मंत्रिमंडळ बैठकीचे स्वागत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्याच्या विकासाचे निर्णय घेण्यासाठी युतीच्या काळात सुरू झालेली औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाची बैठक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी औरंगाबादेत जाहीर केला. याचे सर्वांनीच स्वागत केले, परंतु राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी यावर टीकेचा आसूड उगारला. केवळ घोषणा करून जमणार नाही. राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद झाल्याशिवाय कामे होत नाहीत. तेव्हा अंदाजपत्रकात तरतूद करा नंतरच घोषणा करा, असे म्हणत केवळ निर्णय घेण्यासाठी वेगळ्या ठिकाणी बैठक घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

१९९५ मध्ये युतीचे सरकार आले तेव्हा मराठवाड्याच्या विकासासाठी निर्णय घेण्याच्या निमित्ताने औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यास सुरुवात झाली. काँग्रेस आघाडीच्या काळात ती पुढे रेटण्यात आली. या बैठकीतून फारसे काही साध्य झाले नाही. मुंबईतील अधिकारी औरंगाबादेत दाखल होण्यापूर्वीच येथे काय निर्णय घ्यायचे याचे कागद सोबत घेऊन येत असत, परंतु पुढे बैठकही रद्द झाली. आता तीच बैठक नव्याने सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद मुक्कामी सांगितले. त्यावरून वादविवाद सुरू झाले आहेत.
बैठकीपेक्षा अंदाजपत्रकीय तरतूद महत्त्वाची

बैठक कोठे होते याला महत्त्व नाही. औरंगाबादेत पूर्वी बैठका व्हायच्या. आश्वासने दिली जायची, पण अंदाजपत्रकात त्याची तरतूद केली जात नाही. त्यामुळे आश्वासने देणा-या बैठकीला काहीही अर्थ नाही. केवळ उपचार म्हणून बैठक घेण्यात काहीही अर्थ नाही. घोषणांची अंमलबजावणी अंदाजपत्रकीय तरतुदींशिवाय शक्य नाही. केवळ घोषणा करण्यात अर्थ नाही. त्याऐवजी बैठकीसाठी येणा-या खर्चातून काही गावांचा विकास करता येईल.

तुम्ही सांगा, निर्णय घेऊ
आमच्या पूर्वीच्या युतीच्या सरकारने येथे मंत्रिमंडळ बैठक सुरू केली होती. आता आम्ही पुन्हा ती सुरू करू. मराठवाड्याच्या विकासाचे निर्णय येथेच घेतले जाईल. आता आमची सत्ता आहे, तुम्ही सांगाल ते निर्णय आम्ही घेऊ.
चंद्रकांत खैरे, खासदार, शिवसेना.

सध्याचे सरकार विदर्भवादी
आयआयएम, आयआयटी अशा संस्था मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट नागपुरात नेल्या. तेव्हा त्यांना मराठवाड्याच्या विकासाचा विचार आला नाही. केवळ बैठक घेऊन विकास होत नाही. बैठकीचा खर्च करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली जावी.
सतीश चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी

बैठक हवीच
मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी मी कालच रीतसर पत्र देऊन केली होती. येथील समस्या येथेच सोडवल्या गेल्या तर वेगळे समाधान मिळते. त्यामुळे येथे बैठक व्हावी.
सुभाष झांबड, आमदार, काँग्रेस.

विदर्भाला देतात तसे द्या
सध्याचे मुख्यमंत्री प्रत्येक गोष्ट विदर्भाला देत असल्याचे दिसते. तेव्हा मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक व्हायलाच हवी. विकासासाठी हे गरजेचे आहे. आम्ही यासाठी प्रयत्न तर करूच, पण झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.
इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम.

आम्ही गेल्या तीन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करतोय. मराठवाड्याचे प्रश्न या निमित्ताने प्राधान्याने चर्चेला येतील. स्थानिक नेत्यांचाच दबाव संबंधितांवर असू शकेल. करारानुसार ही बैठक गरजेची आहे. सारंग टाकळकर, सचिव, जनता विकास परिषद.
बातम्या आणखी आहेत...