आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-जालना स्वराज्य संस्था निवडणूक: राष्ट्रवादी बंडखोरीच्या तयारीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 19 ऑगस्टला होणार्‍या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने बंडाची तयारी सुरू केली आहे. औरंगाबाद मनपातील स्वीकृत नगरसेवक अभिजित देशमुख यांनी मैदानात उतरण्याची तयारी करत गुरुवारी अर्ज खरेदी केला.

देशमुख यांच्या पाठीशी अपक्ष, मनसेचे सदस्य आहेत. निवडून आलो नाही तरी चालेल पण पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्याची हीच वेळ असल्याचे म्हणत पक्षाच्या युवा नेत्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये इच्छुकांची प्रचंड स्पर्धा सुरू झाल्याने उमेदवार निश्चितीसाठी मुंबईत शुक्रवारी बैठक घेण्याचे ठरले आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशनचंद तनवाणी यांचा अर्ज 31 जुलै किंवा एक ऑगस्टला म्हणजेच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच मैदानात अधिकृतपणे दाखल होण्याची शक्यता आहे. या आखाड्यात तनवाणींच्या विरोधात काँग्रेसकडून कोण उतरणार, याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. मात्र, इच्छुकांची यादी वाढत गेल्याने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. उद्या सायंकाळी सहा वाजता मुंबईत होणार्‍या बैठकीत काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने बंडखोरीची तयारी केल्याने उमेदवार निवडीवरून बैठकीत वाद होण्याची शक्यताही काँग्रेसच्या गोटातून व्यक्त झाली. गेल्यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसला मतदान करणे बंधनकारक केले नव्हते. यंदा पक्षाच्या वरिष्ठांकडून आदेश आल्यामुळेच देशमुख यांना रिंगणात उतरविण्याची तयारी केल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले.