आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्यांनीच लावला सुरुंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेससोबत युती करण्याची इच्छा राष्ट्रवादीने स्वत:हून व्यक्त केली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नकोच, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला असल्याने जागावाटपात ११३ पैकी ३५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. या जागा देताना कोण तगडा उमेदवार तेथे आहे, अशी विचारणाही काँग्रेसने केली आहे. आघाडी करण्याची काँग्रेसच्या स्थानिक तसेच वरिष्ठ नेत्यांचीही इच्छा होती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेल्या काहींनी आघाडीच्या चर्चेला सुरुंग लावल्याची चर्चा आहे.

शिवसेना-भाजप युती तसेच एमआयएम या पक्षांची घोडदौड लक्षात घेता दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हायलाच हवी, अशी मागणी प्रत्येक कार्यकर्त्याकडून करण्यात येत होती. दोन्ही पक्षांचे जे कोणी नेते शहरात आले, त्यांना कार्यकर्त्यांनी हेच सांगितले. त्यामुळे प्रत्यक्षात कोणतीही चर्चा नसतानाही दोन्ही बाजूंनी आघाडीचे संकेत देण्यात आले होते.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी अधिकृतपणे काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव पाठवला. त्यात किती जागा असाव्यात, असे नमूद न करता आघाडीची गरज स्पष्ट करण्यात आली होती. त्याचबरोबर ज्या वाॅर्डात राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार आहेत, त्या जागा आम्हाला सोडा, असे म्हटले होते.

गुरुवारी रात्री काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठक शहरात झाली. यातील प्राथमिक चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसने ५० जागांची मागणी केली. मात्र, प्रथम आकड्यांचा विचार न करता कोणत्या वाॅर्डात तुमचे तगडे उमेदवार आहेत, याची माहिती त्यांनी मागितली. त्यामुळे राष्ट्रवादीला ३५ जागा दिल्या जाऊ शकतात, असे काँग्रेसच्या वतीने सुभाष झांबड यांनी स्पष्ट केले. प्रदेश पातळीवर चर्चा झाल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल, असे झांबड यांनी सांगितले. तर शिवसेना, भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याची गरज असून काँग्रेसने आणखी जागा द्याव्यात, असे राष्ट्रवादीकडून विनोद पाटील यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली असून शनिवारी राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या हे स्पष्ट होऊ शकते, असे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे आघाडी होते की नाही, याचे चित्र युतीप्रमाणेच ५ एप्रिललाच समोर येऊ शकते.
'त्या' कार्यकर्त्यांना मुद्दाम पुढे केले
राष्ट्रवादीसोबत युती करण्यात येऊ नये यासाठी शहागंज येथील गांधी भवनालाच टाळे ठोकणे हा प्रकार राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनीच केल्याचे समोर येत आहे. आघाडी नाही झाली तर राष्ट्रवादीच्या जागा कमी होतील, राष्ट्रवादीची नाचक्की व्हावी या वैयक्तिक भावनेतून नियोजित आघाडीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. यात माजी नगरसेवकांचा समावेश आहे. सध्या राष्ट्रवादीमध्ये असलेले कार्यकर्तेही यात सक्रिय असल्याचे समजते.