आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरापेक्षा त्यांचे नशीबच मजबूत, चौथ्या मजल्याची भिंत घरावर कोसळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेजारच्या इमारतीची भिंत पडल्याने चक्काचूर झालेले यशवंत पाटील यांचे घर.
नवनिर्माणाधीन इमारतीच्या चौथ्या मजल्याची भिंत शेजारील एकमजली घरावर ढासळली. या वेळी घरात चार मोठ्या व्यक्तींसह दोन लहान मुले थोडक्यात बचावली. ढासळलेल्या भिंतीच्या विटा आणि सिमेंटमुळे एकमजली घराचे पत्रे तुटले. त्यामुळे या घरापेक्षा घरातील लोकांचे नशीबच अधिक मजबूत ठरले.
ठाकरेनगर एन-२ येथील यशवंत पाटील यांच्या घराशेजारी सोमेश्वर आसावा यांच्या चारमजली इमारतीचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. सध्या चौथ्या मजल्याचे बांधकाम सुरू होते. शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान असावा यांच्या घराच्या चौथ्या मजल्याची भिंत पाटील यांच्या एकमजली घरावर कोसळली. भिंतीच्या विटा वेगाने खाली येऊन घरावर कोसळल्याने मोठा आवाज झाला. पाटील यांच्या घरातील सर्वजण प्रचंड घाबरले. पाटील यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील पत्र्याच्या बांधकामाचा चुराडा झाला. सुदैवाने घरातील सर्वजण बाजूच्या खोलीत असल्याने बालंबाल बचावले. घरात सिमेंट आणि विटांचा खच साचला. घरातील लहान मुले तासभर भयभीत राहिली.

वीज खंडित
वादळीपावसामुळे या परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. ही घटना घडली त्याच्या काही मिनिटे आधी पाटील यांच्या गच्चीवर बाळू जाधव नावाचा मिस्त्री डागडुजीचे काम करत होता. भिंत पडण्याच्या काही क्षणांपूर्वीच तो बाजूला गेल्याने त्याचे प्राण वाचले.
मजल्यांना परवानगी नाही
सिडकोच्या११ व्या योजनेच्या अंतर्गत ठाकरेनगर येथे घरे बांधण्यात आली आहेत. या भागात केवळ एक अधिक एक मजला अशीच परवानगी आहे. असे असतानासुद्धा अासावा यांनी पार्किंगच्या वर तीन मजले बांधकाम केले आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नसल्याने पाटील परिवाराने ईश्वराचे आभार मानले. या घटनेत आपले तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...