औरंगाबाद नवरात्रोत्सवात गरबा-दांडिया खेळण्याचा उत्साह सर्वांमध्येच असतो. मात्र, मोठ्या मंडळात जायचे असेल तर चार पैसे खर्च करावे लागतात. शिवाय सुरक्षितता मिळेलच याची हमी नसते. शिवशंकर कॉलनीत सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या दुर्गामाता उत्सवात परिसरातील सर्व नागरिक उत्साहाने सहभागी होतात. मध्यमवर्गीयांची वसाहत असल्याने लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सर्व जण या दांडियाचा आनंद लुटतात.
कॉलनीत राहणाऱ्या अनसूया शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी नातवंडे आणि आजूबाजूच्या मुलांसाठी घरासमोरच दांडियाचे आयोजन केले. अनेक कुटुंबांमध्ये पती-पत्नी दोघे नोकरी करतात. सायंकाळी मुलांना दांडिया खेळण्यासाठी नेणे शक्य होत नाही. शिवाय यासाठी पैसेही मोजावे लागतात. मध्यमवर्गीयांना जाण्या-येण्यासाठी वेळ आणि खर्च लागतो म्हणून अनसूयाबाईंनी मुलांसाठी घरासमोरच दुर्गाउत्सव सुरू केला. त्यांच्या या छोट्याशा उपक्रमाला परिसरातील सर्वांनीच प्रतिसाद दिला. मुलांनाही हे व्यासपीठ हवेच होते. सगळे जण ओळखीतले असल्याने महिलाही सहज गरबा खेळतात.
सर्वच कुटुंबांतील ज्येष्ठ मंडळीही रात्रीच्या वेळी जमतात. नोकरी किंवा गृहकार्यात मग्न असलेल्या महिला यानिमित्ताने मनसोक्त गप्पांचा आनंद लुटतात. जुन्या चित्रपट गीतांच्या तालावर सर्वच ताल धरतात. पारंपरिक देवीस्तुतीची गाणी वाजवण्यावरही भर दिला जातो. सर्वसामान्यांचा दांडिया असल्याने साध्या कपड्यांमध्येच सगळे सहभागी होतात. मात्र, खूप चकचकाट नसला तरीही आनंद आणि जल्लोष येथे पाहायला मिळतो.
सुरक्षा आणि बचत दोन्ही
आमच्याभागातील सर्वांनाच बाहेरच्या मोठ्या उत्सवात सहभागी होणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. शिवाय सुरक्षेचा मुद्दाही आहे. यामध्ये लहान मुलांसोबत तरुणाईही सहभागी होत असल्याने उत्सवाची रंगत अधिकच वाढते. ज्येष्ठांचा याला पाठिंबा असल्याने चार चाँद लागतात. उद्धवशिंदे, शिवशंकर कॉलनी दुर्गामाता उत्सव